Pages

Monday, 24 July 2017

पेंच मधील जंगल सफारी

आयत्या वेळेस संपलेल्या हापिसच्या कामामुळे गडबडीत कसेबसे एकदाचे पेंच व्याघ्र प्रकल्पात सफारी साठी जाणे झाले होते. त्यातच पावसाच्या हजेरीने वातावरण तंग होतं. गत अनुभवावरून अश्या ढगाळ वातावरणात व्याघ्रदर्शन थोडे दुर्लभ होते हे माहित होतेच परंतु जंगलात कुठल्याही क्षणी कुठलाही चमत्कार होऊ शकतो हे देखील माहित होतेच. प्रथमच जंगल सफारी ला येणारी व व्याघ्रदर्शनासाठी उत्सूक मंडळी ह्या वातावरणाच्या खेळाबद्दल अनभिज्ञ होती आणि मी मात्र वाघोबा पहायचाच आणि इतरांनाही दाखवायचा असे मनाशी ठाण मांडून आलेलो असल्यामुळे तणावाखाली होतो. अर्थात चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नव्हता. पहिल्या एक नव्हे दोन सफारी रिकाम्या गेल्या. तसे म्हणायला वानर, चितळ, सांभर, कोल्हे, जंगली कुत्रे, नीलगाय, जंगली डुक्कर वगैरेंसोबत अनेक सुंदर पक्ष्यांनी दर्शन देऊन झालं होतं. ढगाळ वातावरणात सबुरी संपत आलेली असतानाच तिसऱ्या सफारी ला संध्याकाळी मस्त पाऊसधारा कोसळल्या आणि जंगलाने जणू रूपच पालटले. न्हाऊन निघालेली झाडांची पाने हिरवीगार दिसू लागली. मावळतीच्या प्रकाशात प्रत्येक रंग उजळून दिसू लागला. ओल्या मातीचा सुवास आणि थंडगार वाऱ्याची झुळूक अंतरंगात एक प्रकारचा हुरूप आणि चैतन्य देऊन गेल्या.

त्यातच एका वळणावर जवळपास 25 जंगली कुत्र्यांचा कळप वाट ओलांडून गेला. त्यातील काही निवांतपणे पहुडले तर काहींचा खेळ सुरू होता. पुढे परतीच्या वाटेवर आणखी एक जंगली कुत्र्यांचा कळप रस्त्याच्या कडेलाच हरिणाची शिकार खाण्यात मग्न होता. छायाचित्रे घेता घेता लक्षात आले की आपल्या जिप्सि च्या चहूकडे जंगली कुत्रेच आहेत जणू नकळत त्यांनी आम्हाला घेरून टाकले होते. सफरीतील हा अनुभव त्यातल्या त्यात काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान देऊन गेला परंतु वाघोबाचा काही मागमूस नव्हता. सूर्य क्षितिजावर पोहोचू लागला तसे आम्ही बाहेर पडू लागलो. पाऊस पडल्याने सकाळी वातावरण उघडेल व लख्ख सूर्य प्रकाश येईल ह्या आशेनेच जणू.
रात्री थोडे चांदणे पडले होते त्यामुळे आशा पल्लवित होती. सर्वांना ताकीद दिली असल्याने आणि बहुतेकांनी त्याचे पालन केलेले असल्यामुळे पहाटे 5 वाजता आमच्या तिन्ही जिप्सीनी जंगलाच्या प्रवेशद्वारावर पहिला नंबर लावला. वाह!! आज जंगलचा राजा पहायचाच ह्या दृढनिश्चयाने सकाळची सफारी सुरु झाली. वीसेक मिनिटानंतर एका ठिकाणी आम्हास ओल्या मातीत उमटलेले वाघाचे पंजे दिसले. अनुभवी चालकाने जागेच ओळखले कि हे अगदी ताजे पंजे आहेत म्हणजे वाघ जवळपासच असू शकेल. समोरून आमची दुसरी जिप्सि आली. त्यांनी देखील ते पंजे पाहिले होते. दोन्ही अनुभवी गाईड आणि चालक यांनी सल्लामसलत करून वाघ कुठल्या दिशेला गेला असेल यावर विचार करून गाडी त्या दिशेने दामटली. 5 मिनिटे फिरून त्याच जागी येऊन उभे राहिलो. दोन्ही जिप्सि समोरासमोर उभे राहून चर्चा सुरु झाली. वाघोबा जास्त लांबवर तर नसेल गेला? वाघ आहे का वाघीण? पिल्लांचे पंजे दिसत आहेत का? बोलताबोलता आमच्या गाईड ने मागे वळून पाहिले आणि तो ओरडलाच - टायगर टायगर रास्ता क्रॉस करेगा, वो देखो. लागलीच सगळ्यांनी मागे वळून पाहिले. शिकारी प्राण्याची चाहूल लागल्याने हरीण, सांभर, वानर इत्यादी कुठल्याही प्राण्याचा कुठलाही आवाज नसताना सुमडीमध्ये खाली मान घालून चाललेला वाघोबा आम्हा सगळ्यांना दिसला. कुणाला काहीच सुचले नाही. मी तर नुसते मठ्ठासारखे त्याकडे बघत बसलो. तो आला आणि गेला पण वातावरणात आता नुसता उत्साह संचरला होता. त्या गाईड ने सहज मागे वळून बघण्याचा अवकाश आणि वाघोबा दिसण्याचा योग नेमका जुळून आला होता. त्याने मागे बघितले नसते तर ??

आता एक दुवा हाती लागला होता आणि तो सोडायचा नव्हता. आता वाघोबाचा माग सुरु झाला. वाघ पुढे ज्या रस्त्यावर येण्याची शक्यता होती तेथेच जाऊन वाट पाहू लागलो. गाडीचा चालक आणि मार्गदर्शक यांची खरी कसोटी येथेच होती. जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांच्या अनुभवाच्या ताकदीवर पुढे एकूण तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याला रस्ता ओलांडून जाताना पहिला. 


सफारी मधील खरी गंमत ही इथेच असते कारण वाघ दिसणे हेच सर्व काही नाही. वाघासारख्या शिकारी प्राण्याची चाहूल लागताच संपूर्ण जंगल जागं होतं, शिकार होणाऱ्या इतर प्राण्यांचे धोक्याचे सूचक इशारे अक्ख जंगल नीनादून सोडतात. ते आवाज ओळखणे, त्यावरून इशारा देणारा प्राणी ओळखणे, तो इशारा नक्की वाघासाठीच कि कोल्हा, बिबट्या, जंगली कुत्रे इत्यादी अन्य शिकारी प्राण्यांसाठी हे ओळखणे, त्या आवाजाचा माग घेणे, त्यावरून वाघ अथवा अन्य शिकारी प्राणी कुठल्या दिशेला जात असेल ह्याचा अंदाज बांधणे, तो वाघाचा मार्ग कुठल्या रस्त्याला मिळू शकेल इत्यादी अंदाज बांधून योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेस उपलब्ध असणे आणि इतक्या मेहेनतीनंतर व्याघ्र दर्शन मिळणे हीच खरी उपलब्धी आणि तोच अविस्मरणीय प्रसंग आपल्या मनात कायमचा कोरला जातो.

Tuesday, 14 February 2017

जांभळीच्या खोऱ्यातील वनभ्रमंती

कोळेश्वरला ट्रेक आहे, येतोस का? अशी विचारणा झाल्याबरोबर लगेचच मी हेमंत ला होकार देऊन टाकला होता. कित्येक वर्षांपासून कोळेश्वर पठार डोक्यात घर करून होता पण मुहूर्त काही निघाला नव्हता. कोळेश्वराच्या खालच्या अंगाच्या जंगलात फेरफटका मारायचा बेत आहे एव्हडेच कळले. काहीच माहिती न काढता मी ट्रेक ला गेल्याचे हे बहुतेक पहिले अथवा दुसरेच उदाहरण.  दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०१७. 

यतीन, रवी अण्णा आणि चमूसह रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे उजाडताना जांभळी गावात पोहोचलो. रात्रीच्या प्रवासात वाट चुकल्याने धोम जलाशयाला थोडा मोठाच वळसा पडला होता परंतु त्याच कारणाने आमचे कमळगडाच्या पायथ्याच्या गावातून कमळगडाचे जवळून दर्शन झाले. भल्या पहाटे तारेवर बसलेले पारवे, चिवचिव करत उडणारे इवलेसे जांभळे सूर्यपक्षी, गवताच्या टोकावर बसलेले गप्पीदास, धोम धरणाच्या पाण्यातील हळदीकुंकू बदक (Spot Billed Duck) बघून सगळे खुश झाले. जांभळी गावात पोहोचताच राऊ दादांनी आमचे स्वागत केले, लागलीच नाश्त्याचा आग्रह झाला. गरमागरम पोह्यांवर ताव मारतो तोच राऊ दादा म्हणाले, आपल्याला आज बरीच चाल आहे, पोटभर खाऊन घ्या. पोहे संपून ताटात गरमागरम भात, रुचकर आमटी आणि लोणचे वाढले गेले. काहीही आढेवेढे न घेता ते पोटातील कावळ्यांना पोहोचते झाले. मागोमाग चहा आलाच. रात्रभराच्या जागरणाचा शीण कुठच्या कुठे गडप झाला. दिवसभराच्या भटकंती करीता आवश्यक तेव्हडेच सामान - पाणी, दुपारचे जेवण, कॅमेरा, विजेरी (टॉर्च) वगैरे बॅग मध्ये घेऊन, पायात बूट चढवून सगळा चमू तयार झाला. गावात उशीरा पोहोचल्याने भटकंतीची सुरुवात पण तशी उशीराच झाली होती.  नक्की काय काय पाहायचे त्याबद्दल यतीन सोडून कुणालाच कल्पना नव्हती, काही ठरवले देखील नव्हते. 

नदीचे पात्र ओलांडून जाताना
अंजनी ची मनमोहक फुले
कोळेश्वर आणि रायरेश्वर यांच्या बेचक्यात वसलेले जांभळी गाव. येथे पोहोचायला वाईजवळील धोम जलाशयाला वळसा घालून जावे लागते. गावापलीकडेच अजून एक तलाव असून बांध बांधून जांभळी नदीचे पाणी त्यात अडवलेले आहे. बारा महिने त्यात मुबलक पाणी असल्यामुळे या भागात शेती व्यवस्थित होते. लांब दूरवर पूर्वेला पागोट्याच्या आकाराचा केंजळगड ह्या भूभागावर लक्ष देऊन उभा असतो. गावाच्या उत्तरेला ऐतिहासिक महत्व असलेले, शिवरायांनी जेथे स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली, ते सुप्रसिद्ध रायरेश्वराचे पठार तर दक्षिणेला घनदाट अरण्याने वेढलेले, कोळेश्वराचे प्राचीन मंदिर असलेले कोळेश्वराचे पठार दिसते. पश्चिमेला दूर दूर पर्यंत हिरवी गर्द राई. 'येता जावळी जाता गोवली'. आठवली का? चंद्रराउ मोऱ्यांना ज्यामुळे मस्ती चढली होती (जी नंतर शिवाजीराजांनी उतरविली) त्याच जावळीच्या घनदाट रानावनातील एक छोटासा भाग आम्ही आज बघायला जाणार होतो. सध्या राखीव प्रकारातील हा जंगलाचा भाग येथील उपस्थित वन्य जनावरांमुळे लवकरच अभयारण्य होण्याच्या मार्गावर आहे. राऊ दादा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असून जंगलाची निगा राखणे, मानवनिर्मित जलस्रोतामध्ये नियमित पाणी सोडणे, वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या अभ्यास करणे, त्यांच्या खाणाखुणा शोधणे, जंगलातील प्राण्यांच्या वहिवाटीच्या जागी कॅमेरा लावणे  इत्यादी कामे करतात. आज तेच राऊ दादा आणि अजून एक गावातील अनुभवी गृहस्थ (मामा) आमच्यासोबत येऊन वाट दाखवणार होते. 
चला लेको....म्हणत अरण्याकडे आमची वाट सुरु झाली. एक दोन तीन चार म्हणत म्हणत एकेक पक्षी दिसू लागले, पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच होता. रवी अण्णा आणि जयकृष्णन  तर केवळ आवाजावरूनच पक्ष्यांची नावे सांगत. लालबुड्या बुलबुल, खाटीक, सातभाई, गप्पीदास, वटवट्या, जांभळा सूर्यपक्षी, कोतवाल, माळभिंगरी, वेडा राघू, ठिपकेदार होला, छोटा तपकिरी होला, टोईवाला पोपट इत्यादी अनेक विध पक्षी त्यांनी केवळ आवाजाने ओळखले आणि दाखवले. आम्ही बावचळल्यागत निरीक्षण करायचो, फोटो काढायचा प्रयत्न करायचो. एव्हाना आम्ही जांभळी नदीच्या पात्रात प्रवेश केला होता. माझा ट्रेक वर हा एक आवडता उद्योग - जमिनीवर पाय ना टेकवता केवळ दगडांवर पाय ठेवून तोल सांभाळत चालायचे. दगड गडगडला तर मग पंचाईत. परंतु अश्या जोखमीत  देखील नेमक्या दगडावर तो गडगडणार नाही ह्या विश्वासाने पाय ठेवायचा आणि समजा एखादा गडगडलाच तर त्यावरून तोल सांभाळण्याची कवायत करायची. त्या गोलाकार दगडांवरून चालताना मौज येत होती. नदीचे बरेचसे पात्र कोरडे होते पण एखादे ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु असला कि जंगलातल्या निरव शांततेत त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज मन सुखावून जायचा. एखाद्या ठिकाणी साचलेल्या शांत पाण्यात विविध रंगाच्या छटा असलेले शेवाळ साचलेले असायचे. अंजनीच्या वृक्षाच्या खोडावर गुलाबी जांभळ्या रंगाच्या फुलांचा ताटवा सजलेला असायचा. एखाद्या वन्य प्राण्याची चाहूल लागते का याचा माग घेत नजर भिरभिरत असतानाच राऊ दादांचा आवाज यायचा - "चला.... सगळे आले का?" राऊदादांसाठी हि रोजचीच वाट त्यामुळे ते भरभर चालायचे, आमच्यासाठी मात्र नवीन वाट, तीदेखील घनदाट जंगलातील आणि त्यामुळे आमची उत्सुकता नेहमीच शिगेला असायची. वन्य प्राण्यांचा सुगावा लागतोय का कुठे ते ढुंढाळत असतानाच यतीन आणि प्रणोती जमिनीवर उमटलेले प्राण्यांचे ठसे पाहताना दिसले. निरीक्षणाअंती ते बिबट्याचे ठसे असल्याची नोंद करण्यात आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्सुकता, एकाच वेळेस दिसायला लागले. एकामागोमाग एक असे बरेच पुसट ठसे दिसू लागले. एक ठसा मिळाला कि नजर अजून काहीबाही शोधायला लागते. हे बघा... हे अजून.. हे खूर - हरिणांचे, हे वेगळे आणि छोटे आहेत - साळींदराचे, लगेच उत्तरे पण मिळायची. आमच्यातील काही जण नियमित भटकंती करीत असल्याने त्यांच्याकडे जुजबी माहिती होतीच, नसली तर राऊ दादा आणि मामा त्यात भर घालायचे. आणि हे सगळे होते पाऊलवाटांवर. मानवी नव्हे वन्यजीवांचीच वाट. आज आम्ही त्यांच्या वाटेवरून चालत होतो.  

Giant Wood Spider
राऊ दादांकडून अधिकाधिक जंगलाची माहिती मिळत होती. कोळेश्वराच्या पठाराखालील उतारावरील एका झऱ्याला बारमाही पाणी असते. त्या झऱ्याचे पाणी लोखंडी पाईप द्वारे गावापर्यंत पोहोचण्याची सोय केलेली आहे. उतार असल्याने ते पाणी सहज खालच्या जांभळी गावापर्यंत पोहोचते आणि गावकऱ्यांची तहान भागवते. गावाकडे असणारी पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण इथे करावी लागत नाही. ह्या लोखंडी पाईप मधील पाणी वन्यजीवांकरिता देखील वापरले जाते. त्यासाठी तेथे तीन ते चार ठिकाणी छोटे तलाव बांधून त्यात झऱ्याचे पाणी सोडले जाते. एक दिवसाआड त्या तलावात पाणी सोडण्यासाठी राऊ दादा ह्या जंगलात फेरफटका मारतात. आम्हाला अश्याच एका तलावाजवळ जायचे होते पाणी भरून घेण्यासाठी. 

शेकरू चे घरटे

नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा

उंच झाडावर शेकरू ची वाळकी पाने व काटक्या वापरून बनवलेली तीन घरटी दिसली. एका झाडाच्या खोडावर नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. वाघ व बिबट्या अनेक वेळा आपल्या हद्दीच्या सीमा आखताना नरम खोडाच्या झाडांवर अश्या प्रकारे नख्यांनी ओरबाडून खुणा करतात व त्या प्रदेशावर आपला हक्क सांगतात. असेच पुढे जात असताना पायवाटेशेजारी गवतात राऊदादांनी आम्हाला एक विष्ठा दाखवली. प्रथमदर्शनी ती बिबट्याची वाटली. प्रणोती ने ती चाळवून त्याचे निरीक्षण केले. त्यात हरीण अथवा रानडुक्कर सदृश प्राण्याचे केस, नखे, दात, हाडे इत्यादी आढळले. विष्ठेचा भलामोठा आकार पाहून ती एकतर मोठ्या बिबट्याची अथवा पट्टेदार वाघाची असावी असा अंदाज लागला. नक्की कुणाची ते सांगणे मात्र अवघड. प्रणोती म्हणाली - "ठसे दिसले तेव्हा विष्ठा पाहायची होती, आता विष्ठा दिसली आहे तर वाघोबा पण दिसला पाहिजे." 

बिबट्याची विष्ठादोनेक मिनीटातच तो मानवनिर्मित पाण्याचा स्रोत आला. येथे आम्हाला रानगव्याचे पायाचे ठसे आढळले. शेजारीच झाडाच्या बुंध्यावर एक कॅमेरा लावलेला आम्हाला दिसला. त्यात यापूर्वी पाण्यावर येणारे रानगवे, बिबटे, रानमांजर, साळींदर, वाघाटी, अस्वल, भेकर, सांभर इत्यादी वन्यप्राण्यांच्या नोंदी झालेल्या आहेत असे राऊदादांकडून समजले. "चला पाणी भरून घ्या." - दादांची हाक आली. सगळ्यांनी हात तोंड धुवून झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन सोबतच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. यापुढच्या रस्त्याला आम्हाला अजून दुसरा कुठला पाण्याचा स्रोत मिळणार नव्हता. ताजेतवाने होऊन पूढे निघालो. आलटून पालटून पायवाटेवरची  आणि नदीच्या  पात्रातील चाल असे आमचे सुरु होते. नदीचे पात्र आले कि माझा दगड - दगड खेळ सुरु व्हायचा. दूरवरून हुप्प्याचा हूऊप.... हूऊप असा आवाज कानी पडायचा. कुठल्याश्या दगडावर फळांच्या बिया असलेली हुप्प्याची विष्ठा पडलेली असायची. अस्वलाच्या विष्ठेत वाळवी व वारुळाची माती असायची. काळोख्या वाटेवर शिरताना जयकृष्णन आणि रवी अण्णा थांबून थांबून पक्ष्यांच्या आवाजाची चाहूल घेत असत. शेजारचे दोघे चौघे देखील थांबून निरीक्षण करायचे. असेच एका ठिकाणी घुबडाचा आवाज ऐकू आला पण निबिड अरण्यात त्याला केवळ आवाजाच्या दिशेला शोधणे शक्य झाले नाही. रानकोंबड्याचा आवाज तर एव्हाना परिचयाचा झाला होता. बांबूच्या काड्या तुटलेल्या दिसत होत्या, पाने विखुरलेली असायची, छोट्या झाडाच्या खोडाची निघालेली ओली साल गव्याची उपस्थिती जाणवून देत होती. एका ठिकाणी गवताळ भागात गवत इतस्थतः पसरलेले, विस्कटलेले वाटले, जणू एखाद्या प्राण्याची झटापट झाली असावी. यतीन आणि मी बारकाईने पहिले तर गवतावर लालसर डाग आढळले. एखाद्याला ओढून फरपटत नेल्यासारखे वाटत होते. आजूबाजूला निरखून पहिले असता एक दोन दगड लालेलाल झाले होते. पक्की खात्री पटली  होती. येथे एखाद्या हिंस्त्र प्राण्याने शिकार करून ती खाल्ली असावी. फरपटत नेलेल्या दिशेने मी मोर्चा वळवला. केसांचा पुंजका सापडला. एक दोन मीटर अंतराच्या फरकाने अजून पाच ते सहा ठिकाणी केसांचे पुंजके आढळले. आणि शेवटी पुरावा मिळाला. एक अर्धवट खाल्लेले तोंड आणि काही रक्ताळलेली हाडे सापडली. जबडा आणि त्यातील दातांची माळ अगदी जवळच होती. भेकर होते ते. बहुतेक दोनचार दिवसांपूर्वी बिबट्याने केलेली भेकराची शिकार असावी ती. वन्यप्राण्यांच्या वास्तव्याचा अजून काय पुरावा हवा होता? कदाचित आजूबाजूला झाडीमध्ये एखादा वाघ किंवा अस्वल दबा धरून बसलं असेल, चालता चालता अचानक रानगवा समोर आला अथवा अंगावर धावून आला, एखाद्याने काय करावे? सगळं ऐकून - पाहून शहारून जावे कि घाबरून पुन्हा मागे फिरावे कि वन्यजीवनाबद्दल असा एकेक उलगडा होत असताना, अनपेक्षित अनुभव मिळत असताना आनंदून जावे? सगळेच शहारले, सगळेच आनंदले. पुढे अजून काय अनुभव मिळणार होते देव जाणो. 

भेकराची शिकार 
अंजनीची फुले
एव्हाना ऊन्ह चढलं होतं पण जाणवत नव्हतं. वाट बऱ्यापैकी सावलीची होती. नजर भिरभिरत होती, पाचोळा उडत होता. काट्यांपासून वाचत पाय चालत होते. अंजनीच्या खोडावरील गुलाबी-जांभळी फुले मनमोहक होती. मोकळ्या जागी येताच जाणवणारी थंड वाऱ्याची झुळूक प्रसन्नता देत होती. नदीचे पात्र ओलांडून वाट डोंगर चढायला लागली. भुसभुशीत मातीत पाय रोवून केलेल्या छोट्याश्या चढाईनंतर एका मोकळ्या पठारावर आम्ही पोहोचलो. येथून पूर्वेकडचे विहंगम दृश्य नजरेस पडले. दूरवर केंजळगड राजांची आज्ञा मानून ह्या सदाहरित प्रदेशावर पहारा देत उभा ठाकला होता. रायरेश्वराजवळचा नाखिंडाचा डोंगर खुणावत होता. जेथपर्यंत जायचे होते तो टप्पा जास्त दूर नव्हता. एक विसावा घेतला, पाण्याचा घोट घश्याखाली गेला. येथून पुढे चढाई सोपी नव्हती. पर्यटकच काय गावकरी देखील येथे फिरकत नसल्याने मळलेली अशी वाट नव्हती, ती शोधावी लागणार होती. राऊंना काळजी नव्हतीच, जबाबदारी आता त्या जास्त अनुभवी मामांकडे होती आणि मामा त्यांची जबाबदारी लीलया पेलत होते. जंगलातील सगळ्या वाटांची खडानखडा माहिती त्यांना होती. कमरेला खोचलेला कोयता एव्हाना बाहेर निघाला होता, वाटेत येणारी काटेरी झुडुपे एका घावात नाहीशी होत होती. न दिसणाऱ्या वाटेवरून मामा आम्हाला घेऊन जात होते. वानरांनी का शेकरूने अर्धवट खाल्लेल्या फळांचा खच पडला होता. पाचोळा उडत होता, जमिनीवरील वाळक्या काड्या मोडत होत्या, वेली पायात अडकत होत्या. अनोळखी झाडाझुडुपांमध्ये काही ओळखीची पाने दिसत होती. जंगलात आता कडीपत्ता च्या पानांचा व रानफुलांचा सुगंध दरवळत होता. जंगल अधिकाधिक दाट होत होते, आणि एका ठिकाणी मामा थांबले, मागोमाग आम्ही. झाडाच्या पानांची सळसळ सुरु झाली होती. झुडुपांमध्ये वारा घुसू पाहत होता, मनाई करताच सूऊऊ...सूऊऊउ करीत घुमत होता. आम्ही आता कड्याजवळ पोहोचलो होतो. मामांनी आणि राऊदादांनी जागेचा अंदाज घेतला. थोडी शोधाशोध करून एका ठिकाणी उतरण्याचा निर्णय घेतला. "चला.... सगळे आले का?", राव दादांचा आवाज आला. 'हो', असे उत्तर ऐकताच झाडी कापत कापत दोघे उतरले. मागे मी आणि प्रणोती. त्यामागे बाकीचे हळू हळू येऊ लागले. तीव्र उतार आणि घसारा. झाडांच्या मुळांत पाय अडकत होते, कपडे काट्यात फाटत होते, घसरगुंडी होत होती, झाडांचा आधार मिळत होता. अचानक मामा आनंदले, म्हणाले - "घोरपड बघा, घोरपड." नजर फिरवली तर अगदी १५ ते २० फुटांवर एक भलीमोठी घोरपड आमच्या कवायतीकडे लक्ष देऊन शांत बसली होती. शेपटासकट लांबी साडे पाच ते सहा फूट भरेल अशी लांबलचक. झटपट कॅमेरा काढून दोन फोटो घेतले. तिच्या जवळ जाताच ती सावध होऊन झटपट सरपटत निघून गेली. परत आमची मार्गक्रमणा सुरु. 
घोरपड 
घसारा उतरून आम्ही थोड्या मोकळ्या जागेत पोहोचलो. वाऱ्याचा झोत एकदम अंगावर आला. सह्यधारेचा एक अप्रतिम नजारा आता आमच्या डोळ्यासमोर होता. खाली अक्राळ विक्राळ दरी होती. थोडा देखील तोल गेला असता तर आमचा कडेलोट झाला असता. दरीतील एका छोटेखानी डोंगराच्या आकारावरून मी लगेच त्याला ओळखले - चंद्रगड. त्याच्या डावीकडे मागे दूरवर प्रतापगड, शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार. उजवीकडे दरीत ढवळी नदीचे कोरडे पात्र होते, नदीकिनारी छोटेसे ढवळे  गाव. वाह वाह!! एकूण एक जण खूश. सूर्यराव डोक्यावर होते, आनंद साजरा करण्यासाठी पेटपूजा करण्याचे ठरले. उंबराच्या खाली सावलीत पथारी मांडून बटाट्याची भाजी आणि चपात्यांचा फडशा पडला. मिष्टान्न ,म्हणून केक वाटला गेला. 

थोडा आराम करून, शुद्ध हवा ऊरात भरून आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. तोच घसारा आता चढायचा होता. जंगलातील केवळ ह्याच भागात मिळणारे वेत कापून घरातील वापरासाठी मामांनी त्याची मोळी बांधून घेतली. परतीच्या वाटेवर पाऊले भराभर चालली होती. ह्या वेळेस दुसरा रस्ता घ्यायचा असे ठरले होते. जंगल शांत झाले होते. पशुपक्षी जणू दुपारची वामकुक्षी घेत असावेत. "चला...सगळे आले का?" असा राऊदादांचा आवाज तेव्हडा यायचा. त्यांच्या आणि आमच्या मध्ये जास्त अंतर पडले कि त्यांची शिटी वाजायची. एका मोकळ्या पठारावर येताच मामा थांबले. समोरच दिसणारी एक वाट झाडोऱ्यात जात होती. पण मामांची चलबिचल सुरु होती. ह्या जंगलाच्या वाटेने बांबूच्या बनात जाताना अचानक रानगव्याशी सामना होऊ शकतो हे त्यांच्या अनुभवी नजरेने ओळखले होते. काही अनुचित घडू नये हीच काळजी त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर होती. त्यांनी रस्ता शोधेस्तोवर सगळ्यांनी एक बसकण मारली आणि पाणी पोटात ढकलले. तीन चार मिनिटांनी मामांनी आवाज दिला आणि आम्ही सगळे त्यांच्या मागे निघालो. वाट नदी पात्रात उतरली व नदी ओलांडून पुढे गेली. बांबूच्या तुटलेल्या फांद्या, विखुरलेली पाने, ताजी विष्ठा गव्याच्या अस्तित्वाची चाहूल देऊन गेली. मनोमन मामांना आणि त्यांच्या अनुभवाला सलाम ठोकला. वन्य जीवांशी सामना टाळावा ह्याचा प्रयत्न त्या दोघांचा होता तर वन्यजीवांचे दर्शन व्हावे म्हणून आमचा जीव वरखाली होत होता. पण शेवटी सगळ्यांची सुरक्षा महत्वाची. 

काळा बुलबुल 
जांभळी नदीच्या मुख्य प्रवाहाला मिळणारे अनेक ओढे ओलांडत आम्ही निघालो. निळ्याशार आभाळाखाली असलेल्या हिरव्यागच्च जंगलातून एकेक टप्पे ओलांडून आम्ही जंगलाबाहेर पडत असताना नदीशेजारील एका झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट सुरु असलेला ऐकू आला. आपसूकच नजर गेली तर कळले कि अनेक छोटे छोटे पक्षी झाडावर गर्दी करून आहेत. दुर्बीणीतुन पाहून निरीक्षण केले. काळा  बुलबुल - रवी अण्णा ने माहिती दिली. माझ्यासाठी नवीनच, पहिल्यांदाच पाहत होतो. दबत दबत जवळ जायचा प्रयत्न करून त्या पक्ष्यांचे काही फोटो टिपले. बाकीचे मला सोडून पुढे निघून गेले की काय? असा विचार करून मी माघारी वळलो तर हे सगळे नदी पात्रात एका ठिकाणी स्तब्ध बसून काहीतरी पहायचा प्रयत्न करत होते. विचारपूस केल्यावर हेमंत हळूच पुटपुटला - Paradise Flycatcher. स्वर्गीय नर्तक? आश्चर्याने मी त्याने बोट दाखवलेल्या जागी पहिले तर लांबलचक शेपटीचा पांढरा पक्षी  झुडुपातून आत बाहेर करत होता. जवळपास २० मिनिटे प्रयत्न केल्यावर कुठे त्याचा एक व्यवस्थित फोटो मिळाला.

स्वर्गीय नर्तक
फोटो काढण्याच्या खटपटीत बराच उशीर झाला आणि काळोख व्हायच्या आत जंगलाबाहेर पडायचे होते म्हणून आता राऊ दादांची घाई सुरु झाली. भराभर पाय उचलत आम्ही एकदाचे बाहेर पडलो आणि मामांच्या घरी रात्रीच्या मुक्कामासाठी प्रस्थान केले. आजचा दिवस सार्थकी लागला होता.

टीप: जांभळीतील वन व्यवस्थापन समिती या भागातील भ्रमंती नियंत्रित करते व वनखात्याचे अभयारण्याशी निगडित सर्व अटी व नियमांचे येथे पालन केले जाते. येथे जाण्यासाठी वनखात्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांची संपूर्ण अन्नसाखळी येथील निसर्गाने आणि स्थानिकांनी अबाधित राखली आहे आणि येथील स्थानिक हे जंगल अबाधित राखण्यास उत्सुक आहेत. मानव - वन्यजीव परस्परावलंबित्व जपल्याने काय मिळते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे जांभळीचे खोरे!

जांभळी गावातील शेतात असलेली गव्हाची कोवळी लोम्बी 
शेतात दिसलेला चंडोल पक्षी 
तलावाच्या काठावर ढिवर पक्षी 

आम्ही स्वच्छ केलेली सतीशिळा 
जांभळी मधून बाहेर पडताना खालच्या वाडीत एका देवळासमोर रस्त्याच्या कडेला अनेक विरघळी व सतीशिळा पडलेल्या दिसल्या. उत्सुकतेने तेथे जाऊन त्या पहिल्या, त्यातीळ एका सतिशीळेवरील माती काढून ती साफ केली, त्याचे फोटो काढले. मंदिर परिसरातील लोकांकडे विचारपूस केल्यावर कळले कि मंदिराचा जीर्णोद्धार करताना अश्या अनेक कोरीव शिळा गावकऱ्यांना जमीन उकरताना सापडल्या आणि अजाणते पणे लोकांनी त्या पुन्हा मंदिराच्या पायात गाडल्या. मंदिराच्या आवारात अजून काही भग्नमूर्ती, दीपस्तंभाचे दगडी खांब झाडाखाली ठेवले होते. ज्या काही शिळा, समाध्या बाहेर होत्या त्यावरील नक्षीकाम, कोरीवकाम जबरदस्त होते. एका चौकोनी दगडावर अष्टपाद (आठ पायांचे) कासव कोरलेले होते. स्त्री लढवय्या असलेल्या विरघळी पहिल्यांदाच माझ्या पाहण्यात आल्या होत्या. भाले व तालवारींनी लढणारे सैनिक, धनुर्धारी, घोडेस्वार, हत्ती, इत्यादी कोरीवकाम त्या शिळांवर होते. त्या कोरीव शिल्पांचे वैशिष्ट्य मी तेथे उपस्थित गावकऱ्यांना सांगून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल, या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला. अनेक स्थानिक लोकांना ह्याबाबतीत काहीच रस नसल्याचे निदर्शनास आले तर काहींनी उत्सुकतेपोटी सर्व लक्ष देऊन ऐकले.  

स्त्री लढवय्या 

 
इतस्ततः पडलेला ऐतिहासिक वारसा

मंदिराच्या आवारातील सतीशिळा, भैरव मूर्ती 

मंदिराच्या पायात गाडलेली विरघळ
आणि अश्या प्रकारे एका अविस्मरणीय ट्रेक ची सांगता झाली. आजपर्यंतच्या अनेक भटकंती पैकी लक्षात राहण्याजोगा अजून एक ट्रेक म्हणजे जांभळीच्या खोऱ्यातील वनभ्रमंती. 

भटकंती मधील भागीदार सभासद ज्यांच्यामुळे अविस्मरणीय अनुभव मिळाला - यतीन नामजोशी, रवी वैद्यनाथन, जयकृष्णन, चंद्रशेखर दामले, हेमंत नाईक, एलरॉय सेराओ, प्रतिष साने, प्रणोती जोशी

धन्यवाद.

सह्याद्रीत भटकंती करताना शिस्त बाळगा, सह्याद्री वाचवा. 

Tuesday, 13 September 2016

नितांतसुंदर पांडवगड

आडवाटेवरचे किल्ले करायचे झाले तर अनेकांच्या मनात सहजा सहजी न डोकावणारा परंतु अवशेषांनी संपन्न असलेला प्राचीन किल्ला म्हणजे वाई जवळचा पांडवगड. वाई शहरापासून जवळच वाई - मांढरदेवी रस्त्यावर धावडी गावानजीक असलेला नितांतसुंदर असा पांडवगड सध्या खाजगी आक्रमणाच्या विळख्यात सापडलेला किल्ला आहे. गडाचा वरचा भाग म्हणजे जवळपास २४ एकर जागा एक पारशी गृहस्थ शेर वाडिया यांच्या मालकीची होती व ते जवळपास २० ते २२ वर्षे एकटेच त्या ठिकाणी वास्तव्यास होते. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले व त्या नंतर गडावरील सदर जागा mapro कंपनी च्या ताब्यात आहे. सध्या कंपनी तर्फे तीन माणसे गडावरील घरात पहारा देण्यासाठी नियुक्त केलेली आहेत. खाजगी मालमत्ता असल्याने रात्री गडावर मुक्काम करता येत नाही. पायथ्याच्या गुंडेवाडी गावातील एक मनुष्य - श्री बाळू कोंडके रोज गडावर एक फेरी मारतात. डोंगरावरील जंगलात रानडुक्कर, बिबट्यांचा वावर आहे. गड व्यवस्थित पहायचा असेल तर दिवाळी नंतर जाणे उत्तम जेणेकरून गडावरील झाडोरा बऱ्यापैकी सुकलेला असतो व पायवाट ठळक दिसते. 

पांडवगडावर जाण्यासाठी मुख्य दोन वाटा आहेत. एक मेणवली गावातून चढणारी, जवळपास अडीच तासात गडावर पोहोचवणारी, उभ्या चढणीची वाट आणि दुसरी धावडी गावापुढील गुंडेवाडी येथून श्री. बाळू कोंडके यांच्या घराशेजारून जाणारी, तासाभरात गडावर पोहोचवणारी सोपी वाट. ही दुसरी वाट उभ्या चढाई ची असली तरी वळणदार रस्ता व दाट जंगल यामुळे चढण्यास सोयीची पडते. सकाळी लवकर उन्हे चढायच्या आत आपण चढाई ला प्रारंभ केला तर उत्तम.  ह्या मळलेल्या व वळणा वळणाच्या वाटेने आपण लगेचच उंची गाठतो व जवळपास तीस ते चाळीस मिनिटात आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. येथून आपल्याला मांढरदेवीचा डोंगर व भोवतालचा मुलुख दिसतो. पुढे अजून अर्धा तासाच्या चढाई नंतर आपण गडमाथ्यावर येतो. वाटेत काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. एकेकाळच्या पारशी गृहस्थांच्या घरातील mapro कंपनी चे पहारेकरी आपले स्वागत करतात. येथे थोडा आराम करून आपण गड फेरीला निघालो कि अनपेक्षित असे बरेच काही दाखवून पांडवगड आपले समाधान करतो. 

सर्वप्रथम आपण गडाच्या बालेकिल्ल्याला डावीकडे ठेवून पुढे निघालो कि डावीकडे काही पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या टाक्यातील पाणी थोडे खराब असून पहारेकरी त्यांचा वापर अंघोळीसाठी करतात. पुढच्या दुसऱ्या टाक्यातील पाणी स्वच्छ व पिण्यालायक असून त्यात जंगली जनावरे पडू नयेत म्हणून त्यास जाळीचे कुंपण केले आहे. हे खांब टाके असून ते हा गड शिलाहारकालीन असल्याचा पुरावा देतो. येथील पाणी वर्षभर उपलब्ध असते. येथे आपल्या बाटल्या भरून पुढे निघालो कि डावीकडे अजून ३ पाण्याची टाकी दृष्टीस पडतात परंतु त्यापैकी कुठल्याच टाक्यातील पाणी पिण्यास योग्य नाहीये. वाटेने पुढे जाताना उजवीकडे कड्या लगत छोट्या तटबंदीचे अवशेष दिसत राहतात. येथूनच आपल्याला धोम धरण व त्यामागील जलाशयाचे मनोहारी दर्शन होते. 

बालेकिल्ल्याला डावीकडे ठेवत याच वाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक वाट खाली उतरताना दिसते. खडकात खोदलेल्या काही पायऱ्या आणि दरवाज्याचे अवशेष पार करून हि मळलेली वाट खालच्या पठारावरील भैरवनाथ मंदिराकडे व तेथून पुढे पश्चिमेकडील मेणवली गावात उतरते. दरवाजा पाहून पुन्हा आल्या वाटेने कड्याखाली यायचे व कड्याला डावीकडे ठेवत एक प्रदक्षिणा मारायची. काही अंतरावर डावीकडे कातळात खोडलेली एक छोटीशी गुहा व त्यात शेंदूर लावलेले दगड देव दिसतात. उजवीकडे खाली पाण्याची दोन टाकी आहेत. त्यातील एक बऱ्यापैकी  बुजलेले असून दुसऱ्यात स्वच्छ पाणी आहे. आणखी पुढे गेल्यावर अशीच अजून एक गुहा असून त्याचे खांब बऱ्यापैकी झिजले आहेत. गुहे शेजारीच कड्यात खोदलेले पाण्याचे टाके तर उजवीकडे खाली दोन पाण्याची सुकलेली टाकी आहेत. यात उतरण्यासाठी खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. आपली प्रदक्षिणा अशीच पूर्ण करत पुढे गेल्यावर डावीकडे भक्कम तटबंदी दिसते. येथून थोड्याच अंतरावर आपल्याला डावीकडे एक खणखणीत बुरुज दृष्टीस पडतो. या बुरूजाजवळूनच बालेकिल्ल्याला जाण्याची वाट आहे. एका मागोमाग असे दोन दरवाज्यांचे अवशेष असून त्यांची कमान शाबूत नाहीये. चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना डावीकडे  जवळपास १८ फुट उंचीची भक्कम तटबंदी उभी असते. साधारण ४० फुटांवर पुढे उजवीकडे अजून एक बुरुज आपला मार्ग अडवतो. पुन्हा चिंचोळ्या वाटेने मार्गक्रमणा करत व एकूण तीन दरवाज्यातून आपला प्रवेश बालेकिल्ल्यावर होतो. डावीकडे तटबंदी लगतच जेमतेम तग धरून असलेले हनुमानाचे मंदिर असून वीरासानातील मूर्ती लक्षवेधक आहे. मंदिरा समोरच उत्तम स्थितीतील एक चुन्याचा घाणा आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारे चुन्याचे मिश्रण बनवण्यासाठी याचा वापर होत असावा. येथून पुढे जाणारी एक वाट पांडजाई देवीच्या मंदिरापाशी घेऊन जाते. कधीकाळी जीर्णोद्धार केलेले हे मंदिर सध्या बरीच पडझड झालेल्या अवस्थेत असून छप्पर गळके आहे. मंदिरा शेजारीच एक समाधी, दगडी स्तंभ, दगडी दिवा, दगडी पात्र, एक शिवलिंग व नंदी असून आत पांडजाई देवीची सुबक मूर्ती आहे. देवीचे दर्शन घेऊन आल्या वाटेने पुन्हा दरवाज्य पाशी येउन आपली बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी डावीकडच्या वाटेला लागायचे. हि वाट आपल्याला पुन्हा पारशी गृहस्थाच्या घरी घेऊन जाते. जाताना उजवीकडे काही पाण्याची टाकी व एक भला मोठा तलाव दृष्टीस पडतो. ९ पाण्याची टाकी व एक भला मोठा तलाव असून देखील केवळ एकाच टाक्यातील पाण्याला उपसा असल्यामुळे व नेहमीच्या वापरात असल्यामुळे पिण्याजोगे आहे. भरपूर पाण्याचा साठा व घरांचे अवशेष पाहून असे जाणवते की कधीकाळी ह्या किल्ल्यावर बराच राबता असला पाहिजे. संपूर्ण गडफेरी करायला दीड तास पुरतो. 

पारशी वाड्यात मुक्कामाची परवानगी नाही व गडावर कुठेच मुक्कामाला सोय नाहीये त्यामुळे आपली पावले परतीच्या प्रवासाला वळवायची. आल्या वाटेने गुंडेवाडी ला पोहोचायला पाउण ते एक तास लागतो. अश्या प्रकारे एकूण साडेचार ते पाच तासात आपला पांडवगड पाहून होतो. गुंडेवाडीतून वाई ला जाण्यासाठी दर दीड तासाला महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस उपलब्ध असतात. 

असा हा वाकड्या वाटेवरचा प्राचीन पांडवगड त्याच्या अंगा - खांद्यावरचे विविध अवशेष दाखवून त्याची सफर सार्थ ठरवतो. मोठ्या सुट्टीत पांडवगड ला जोडून भुईंज जवळचे चंदन - वंदन हे जोडकिल्ले व पाचवड जवळचा वैराटगड करता येऊ शकतो. पायथ्याचे धावडी गाव बऱ्यापैकी सधन असून ह्या गावात मुक्काम करायचा झालाच तर शाळेच्या आवारात सोय होऊ शकते. परंतू गावकऱ्यांकडून मदतीची कसलीही अपेक्षा न ठेवता आपले सर्व सामान सोबत ठेवावे. 

कुसूर घाट

कोकणातून पुण्यास मालवाहतूक करण्यासाठी कित्येक वर्षांपूर्वीपासून वापरात येणारा कुसूर घाट कोकणातील भिवपुरी ते आंदर मावळातील कुसूर या गावंदरम्यान आहे. बैलांच्या पाठीवर समान लादून ही वाहतूक करण्यात येत असल्यामुळे रस्ता बर्यापैकी मोठा, सोप्प्या चढाईचा व वळणा - वळणा चा असून जुन्या पायवाटेचे अवशेष अजूनही काही ठिकाणी सापडतात. घाट सुरु होतो तेथेच एक वाघजाई देवीची मूर्ती आहे, काही ठिकाणी ब्रिटीश कालीन मैलाचे दगड शाबूत आहेत. दरड कोसळू नये म्हणून उतारावर लावलेले व वळणावर लावलेले दगडी चिरे रस्त्याच्या कडेला पसरलेले असून ते ह्या प्राचीन घाटाची उपलब्धता व महत्व पटवून देतात. घाटाच्या मध्यावर पाण्याची ४ टाकी खोदून काढली आहेत त्यावरून ह्या घाटाच्या प्राचीनतेची साक्ष मिळते. वेळ वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तयार केलेली नवीन पायवाट ह्या जुन्या मार्गाला भेटतच पुढे जाते व ती काही ठिकाणी उभा चढ घेते. परंतु या वाटेने वर गेल्यास पाण्याची टाकी आड वाटेला राहतात व ती सहजा सहजी दिसत नाहीत. त्यामुळे ती पाहण्यासाठी गावातीलच एखादा वाटाड्या सोबत असला तर उत्तम. पायथ्याच्या भिवपुरी गावात बांधलेला तलाव हा पानिपत च्या रणांगणात वीरगती प्राप्त झालेल्या सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीबाई यांनी सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधवून घेतला होता. मालवाहतूक करणारे लमाण, हमाल, पशु यांची तहान भागवण्यासाठी घाटाच्या खाली व वर अश्या दोन्ही ठिकाणी तलाव बांधून काढले आहेत. भिवपुरी गावातील तलाव अजूनही उत्तम अवस्थेत असून तलावातील पाणी तेथील गावकरी धुनी धुण्यासाठी वापरतात. कुसूर गावाजवळील तलाव ओस पडला असून गावकऱ्यांनी तलावाचे घडीव दगड आपापली घरे बांधण्यासाठी केला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थच देतात. घाट चढायला २ ते २.५ तास पुरेसे आहेत. घाटाच्या उजवीकडे ढाक चे पठार असून ढाक किल्ला मध्येच कधीतरी दर्शन देतो. डावीकडे भिवपुरी गावातून सावळे गावात गेलेली टाटा विद्युत केंद्राची पाण्याची पाईप लाईन व त्या पलीकडे फेण्यादेवी घाट दिसत राहतो. घाटाचा संपूर्ण मार्ग हा दाट जंगलातून जात असून अनेकविध पक्ष्यांची शिळ कानावर पडत राहते. मुंबई अथवा पुण्याहून एका दिवसाच्या चढाई साठी कुसूर घाट हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. दोन दिवसाची भटकंती करायची असेल तर लोणावळा हून कोंडेश्वर मार्गे कुसूर गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कुसूर घाट उतरून भिवपुरी अथवा कर्जत ला जाता येईल. भटक्यांच्या यादीतून दूर राहिलेल्या फेण्यादेवी घाट व कुसूर घाट अश्या दोन घाटवाटा एक मुक्काम करून धुंडाळता येऊ शकतात. परंतू शहरी जीवन व तेथील कचऱ्यापासून लांब राहिलेल्या ह्या सुंदर प्रदेशाची पुरेशी काळजी घेऊनच मार्गक्रमणा करावी व तेथील निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यावा. 

Friday, 3 June 2016

मावळ व नेर

पुणे शहराच्या पश्चिमेकडे (कोकण आणि पुणे या मधील भागाला) म्हणजेच बोली भाषेत मावळती कडे असलेल्या प्रदेशाला मावळतीचा प्रदेश अथवा मावळ असे संबोधले जाते. या मावळ प्रदेशाचे १८ विभाग असून त्यातील बहुतेकांना तेथे वाहणाऱ्या नद्या, उपनद्यांच्या नावावरून अथवा त्या प्रदेशातील एखाद्या गावाच्या नावावरून ओळखले जाते. हा मावळ प्रदेश पुणे आणि जावळी ह्या  दोन परगण्यांमध्ये समावेश होतो. ह्या मावळ प्रदेशाच्या उत्तर - दक्षिण सीमांना अनुक्रमे भीमा नदी आणि कृष्णा नदी आहे.


१. आंदर मावळ - आंध्र नदी चे खोरे (जुन्नर परगणा चा प्रदेश)
आंदर मावळ भागात कुसूर घाट व कुसूर पठार, ढाक किल्ला, ठोकरवाडी धरण / आंध्र जलाशय इत्यादींचा समावेश होतो.
(आंध्र नदी ही इंद्रायणी नदीची उपनदी आहे का ?)


२. नाणे मावळ - इंद्रायणी नदीचे खोरे
नाणे मावळ भागात हिंदोळा घाट, पायरा घाट, बोर घाट, कुरवंडा घाट, लोणावळा, लोहगड, विसापूर किल्ल्यांचा प्रदेश इत्यादींचा समावेश होतो.


३. पवन मावळ - पवना नदीचे खोरे
पवन मावळात तुंग व तिकोना किल्ल्यांजवळ असलेल्या पवना नदीच्या खोऱ्याचा समावेश होतो.


४. कर्यात मावळ - पुणे कर्यात.
आदिलशाही व निजामशाही च्या काळात व त्यानंतर स्वराज्यात देखील गावांची रचना करताना सुभा / परगणा / मामला यांच्या देखरेखी खाली टाप, तर्फ, कर्यात व सम्मत आणि त्यांच्या देखरेखी खाली मौजा, माजरा, कसबा अशी आकाराने लहान गावे येत. पुणे कसबा च्या आजूबाजूचा प्रदेश कर्यात मावळ मध्ये समाविष्ट होतो.


५. गुंजण मावळ - गुंजवणी नदीचे खोरे
गुंजण मावळात तोरणा व राजगडकिल्ले, या किल्ल्यांजवळून वाहणारी गुंजवणी नदी च्या खोऱ्यातील भागाचा, पाबे, वेल्हे अशी गावे इत्यादींचा समावेश होतो.


६. हिरडस मावळ - नीरा नदीचे खोरे
हिरडस मावळात भोर जवळील हिरडोशी गाव व नीरा नदीच्या उगमाकडील प्रदेशाचा समावेश होतो.


७. मुठे खोरे - मुठा नदीच्या उगमा जवळील खोरे
मुठे खोऱ्यात मुठा नदीचा उगमस्थान असलेले ठिकाण - टेमघर जलाशयाचा भाग, खडकवासला जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो.


८. पौड खोरे - मुठा नदीचे खोरे (पौड गावाजवळील)
पौड खोऱ्यात सव घाट, वाघजाई घाट, सवाष्णी घाट, गाढवलोट घाट, लेंडी घाट, ताम्हिणी घाट इत्यादींचा समावेश होतो. (ह्याच भागाला कोरबारसे मावळ असे देखील संबोधतात ??)


९. मोसे खोरे - मोसी नदीचे खोरे
मोसे खोऱ्यात देव घाट, कुम्भे घाट, कावळ्या घाट, कोकणदिवा किल्ला, धामणहोळ, वरसगाव चा जलाशय इत्यादींचा समावेश होतो.


१०. ताम्हन खोरे - पौड तर्फ चा प्रदेश


११. कानद खोरे - कानंदी नदीचे खोरे
कानद खोऱ्यात तोरणा व राजगड ह्या दोन किल्ल्यांच्या पायथ्याचे वाजेघर, साखर, मार्गासनी तसेच ह्या किल्ल्यांच्या भागात वाहणारी कानंदी नदी च्या खोऱ्याचा समावेश होतो.


१२. खेडेबारे खोरे - शिवगंगा नदीचे खोरे
खेडेबारे खोऱ्यात सिंहगड व पुरंदर या किल्ल्यांच्या डोंगर रांगांमधील खेड शिवापूर, कापूरहोळ व तेथून वाहणारया शिवगंगा नदी चे खोरे यांचा समावेश होतो. शिवगंगा नदी ही  गुंजवणी नदीची उपनदी आहे.


१३. वेळवंड खोरे - वेळवंडी नदीचे खोरे
वेळवंड खोऱ्यात तोरणा आणि राजगड किल्ल्यांच्या दक्षिणेकडील वेळवंडी नदीचे खोरे, भाटघर जलाशय इत्यादी प्रदेशाचा समावेश होतो. वेळवंडी नदी ही गुंजवणी नदीची उपनदी आहे.


१४. रोहीड खोरे - नीरा नदीचे खोरे (रोहिडा किल्ल्याचा प्रदेश)
रोहीड खोऱ्यात नीरा नदीच्या जवळचा रायरेश्वर, रोहीडा किल्ला इत्यादी भागाचा समावेश होतो.


१५. शिवथर खोरे - शिवथर घळ जवळील खोरे
शिवथर खोरे हे एकच खोरे असे आहे की ते पूर्णपणे कोकणात आहे. त्यात रामदास स्वामींची प्रसिद्ध शिवथर घळ, वरंधा घाटाचा परिसर (कदाचित रायगड देखील) समाविष्ट होतो.


१६. कान्दाट खोरे - कान्दाट नदीचे खोरे (जावळी चा प्रदेश)
कान्दट खोऱ्यात चकदेव, पर्वत, महिमंडण गड असा जावळी चा प्रदेश येतो.


१७. जोर खोरे - जोर गाव (जावळी चा प्रदेश)
जोर खोऱ्यात कोळेश्वर पठार आणि महाबळेश्वर या मधील प्रदेश, जोर गाव व कृष्णा नदीच्या खोऱ्याचा उगमाकडील भाग समाविष्ट होतो.


१८. जांभूळ खोरे - जांभळी गाव (जावळी चा प्रदेश)
जांभूळ खोऱ्यात रायरेश्वर आणि कोळेश्वर पठारा दरम्यानचे जांभळी गाव, कमळगड, केंजळगड, धोम जलाशय  असा प्रदेश येतो.


शाहजी राजे यांना जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली त्यावेळेस त्यांना पाच परगणे आणि बारा मावळ एव्हडा प्रदेश मिळाला असे कळते.


शाहजी राजांच्या जहागिरीतील पाच परगणे - पुणे, इंदापूर, चाकण, शिरवळ, सुपे
शाहजी राजांच्या जहागिरीतील मावळ प्रदेश - गुंजण मावळ, हिरडस मावळ, कर्यात मावळ, वेळवंड खोरे, खेडेबारे खोरे, कानद खोरे, पौड खोरे, मोसे खोरे, मुठे खोरे.
नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळ तसेच जावळी चे खोरे हे त्यांच्या जहागिरी चा भाग नव्हते.


जसे मावळ प्रदेश तसेच बारा नेर - पुणे आणि जुन्नर ह्यामधील नदीच्या खोऱ्यांचा प्रदेश


१. मिन्नेर - नारायणगाव जवळील मीना नदी चे खोरे (वडज धरण)
२. कोकडनेर - कुकडी नदीचे खोरे (माणिकडोह धरण)
३. भामनेर - भामा नदीचे खोरे
४. भिमानेर - भीमा नदीचे खोरे
५. मढनेर - हरिश्चंद्रगड व शिंदोला किल्ल्यांमधील पुष्पावती नदीचे खोरे (पिंपळगाव जोगा धरण)
(मढ नावाच्या गावावरून मढ -नेर असे नाव पडले)
६. घोड्नेर - घोड नदीचे खोरे (डिंभे धरण)

Tuesday, 16 June 2015

पावसाळ्यातील भटकंती

पावसाळ्यातील भटकंती
 
पावसाळा, हुरूप व चैतन्य -
पावसाळा आला की प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. प्रत्येकाचं मन ओल्या चिंब वातावरणात न्हाऊन निघत असते. अश्या वेळेस अनेकांचे बेत ठरतात ते गरमागरम चहा आणि कांदा भजीचे. पण आपल्या सारख्या भटक्यांचे पाय मात्र घरी टिकत नसतात. मग इथे ठरतात डोंगरवर चढ़ाई चे बेत. चार पाच टाळकी जमावयाची, शहरातील गर्दी पासून दूर एखाद्या आड़ वाटेला जायचे, हिरव्यागार जंगलातील वाटेवर चालत असताना आभाळातून बरसणाऱ्या पावसात भिजायचे, एखाद्या कड्यावरुन कोसळणाऱ्या फेसाळत्या धबधब्यात चिंब व्हायचे, किल्ल्यांवरील अवशेष पाहत तेथील इतिहासात रममाण व्हायचे, डोंगरावरील धुक्यात हरवून जायचे, पायथ्याच्या वाडीत एका म्हाताऱ्या आईने अतिशय मायेने वाढलेल्या गरमा गरम पिठलं भाकरी वर ताव मारायचा.
असंच सगळं छान छान वाटत असताना एखाद्या आड़ वाटेवर गेलेल्या काही लोकांच्या क्लेश दायक बातम्या पण कधीतरी हळूच कानावर पडतात. एखाद्याला रेस्क्यू करायची वेळ येते, एखादा कायमचा जायबंदी होतो तर एखादा आपल्या प्राणास मुकतो. अश्या वेळेस भटकंती ला गालबोट लागते.
या विषयावर सांगताना नवख्या भटाक्यांना गृहीत धरूनच काही गोष्टी संगितल्या जातील तर काही गोष्टी केवळ पावसातीलच नव्हे तर सर्व प्रकारच्या वातावरणात उपयोगी पडतील.
ट्रेक चे प्लानिंग / पूर्वतयारी -
भटकंती करताना सगळ्यात महत्वाचे असते ते प्लानिंग अथवा पूर्वतयारी. जेथे जायचे त्या ठिकाणाची सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे. त्या करीता विविध वेबसाइट वर शोधून सम्बंधित ठिकाणा बद्दल ची माहिती गोळा करावी. तेथे जाऊन आलेल्या दो-चौ जणांशी बोलून तेथील मार्गा बद्दल चौकशी करावी, फ़ोटो पहावे, नकाशा पहावा, वाटेवरील खाणा खुणांची माहिती घ्यावी व आपल्यासोबत येत असलेल्या इतर सवंगड्यांना ती द्यावी.

बरेचदा जंगलात वा धुक्यात वाट चुकण्याची शक्यता असते त्यामुळे एखादा माहितगार सोबत असलेला नेहमीच चांगला. शक्यतो गावातील एखादा वाटाडया घेता आला तर उत्तम. परंतु त्यांच्याशी देवाण घेवाणी बद्दल आधीच बोलणी करून घ्यावी म्हणजे नंतर वाद होत नाहीत.
एकट्याने भटकंती करणे टाळावे तसेच आपण जेथे जातोय त्याबद्दल घरच्यांना कल्पना जरूर द्यावी.
पावसाळ्यात शक्यतो सोप्पी श्रेणी असलेले गड किल्ले अथवा घाटवाटा ची निवड करावी. ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावे लागत असेल अथवा जेथे दरड कोसळण्याची शक्यता असते अथवा दरड कोसळून अपघात झाल्याचा इतिहास असतो अश्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे.
विविध ऋतुंमध्ये वेगवेगळ्या वातावरणात एकाच ठिकाणी आपल्याला अनेक वेगळे अनुभव येतात. पावसात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात एकच गड वेगवेगळा भसतो. परंतु काही लोकांना एकाच ठिकाणी पुनः पुनः जायला आवडत नाही.
एखाद्या किल्ल्यावर फार तूरळक अवशेष असतात तर एखादा राजगड सारखा किल्ला अवशेषांनी व त्या भूमिवरील ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असतो. अश्या उंचीवरच्या ठिकाणी पावसाळयातील धुक्यात ना अवशेष पाहता येत ना वरून दिसणारे दृश्य. अश्या वेळेस एकतर असा किल्ला पाहणे टाळावा अथवा पुनः त्यास भेट द्यायची तयारी ठेवावी.

एखाद्या संघटने सोबत जात असलो तर त्या संघटने बद्दल जाणून घ्यावे, त्यांच्या सभासदां कडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे ना याची चौकशी करून घ्यावी. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आपल्या घरच्यांना देऊन ठेवावेत.
पेहराव कसा असावा ? -
नवीन एखादा भटका साधारण विचार करतो की पावसात जायचे आहे भिजायला आणि मज्जा मस्ती करायला, चिखल माती लागून ख़राब तर होणार असे समजून अडगळीतील एखादी जुनी बॅग, पडिक बूट बाहेर निघतात. हे टाळावे. अश्या वेळेस बॅग फाटली, चैन तुटली, पाण्यात भिजुन बुटाचा सोल निघाला तर पंचाईत होते. एकदम नविन करकरित बूट घातले व ते पायाला चावले तरी संकट. त्यामुळे एकतर नविन बूट 8-10 दिवस वापरून पहावेत अथवा रोजच्या वापरतील बूट घालावेत. अनुभवाने सांगेन की एक्शन ट्रैकिंग चे बूट हे सगळ्यात चांगले. स्वस्त आणि मस्त. दिसायला साधे असले तरीही ओल्या खड़कावर देखील घसरत नाहीत. शेवटी माणूस चलताना कसा तोल सांभाळतो यावर सगळे अवलंबून असते. सोल निघुन पंचाइत होण्यापासून वाचण्याकरिता जुन्या एखाद्या बुटाची नाड़ी आपल्यासोबत असली की फाटलेला बूट बांधता येतो.
भटकंती साठी निघताना पेहराव हा नेहमी आपल्याला कम्फ़र्टेबल असा असावा. भटकंती करताना आपल्याकडे कमीत कमी वजन असावे. जीन्स ची पैंट शक्यतो टाळावी कारण भिजल्यावर तीचे वजन वाढून आपल्याला त्रास होतो. ती सुकण्यास देखील जास्त वेळ जातो. शिवाय अंगाला चिकटून असल्यामुळे व्यवस्थित मोकळेपणाने हालचाल करता येत नाही.

हाफ पैंट व अर्ध बाह्यांच्या टी शर्ट मुळे आपले अर्धे अंग उघडे असते. पावसात बहुतेक ठिकाणी झाडोरा माजलेला असतो. काटेरी झुडुपे वाढलेली असतात. त्यांचा शरीराशी संपर्क होऊन घाज येणे, कापणे, हाता पायावर ओरखडे येणे वगैरे पासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे सोईस्कर. सध्या लवकर सुकणारे - क्विक ड्राय प्रकारचे कपडे मिळतात ते पावसाळी भटकंती करीता उत्तम.
सोबत बाळगण्याची औषधे -
पावसाळया तील बदलत्या वातावरणात कधी कुणाची तब्येत बिघडेल सांगता येत नाही. सर्दी ताप तर नित्याचेच. त्यामुळे ग्रुप मधील एक अथवा दोन व्यक्तींकडे औषधांचा साठा असावा. प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तम.
सर्दी - खोकला
ताप
उलटी - जुलाब
पोटात मळमळ
सांधेदुखी
जखम होणे
चपलांमुळे पायाला फोड़ येणे
भाजणे
मुरगळणे
काटा रुतणे
खाज व बुरशी येणे
इत्यादिवर औषध असणे गरजेचे आहे.
एखाद्याला डॉक्टर ने काही औषधे दिली असल्यास ती जरूर सोबत बाळगावित. दमा अथवा ऊंचीचा त्रास अथवा एखाद्या विशिष्ट आजार असल्यास ग्रुप लीडर ला त्याबद्दल आगाऊ कल्पना द्यावी.

दाट जंगलातील ठिकाणी ट्रेकिंग ला जाताना जळवांपासून वाचण्याकरिता बाजारात मिळणारी तंबाखूची पेस्ट सोबत बाळगावी. जळू लागल्यास हि पेस्ट लावावी.

पावसाळ्यात आल्हाद दायक वातावरणात तहान लागत नाही परंतू चालल्यामुळे, चढल्यामुळे शरीरातील पाणी वापरले जाते. अश्या वेळेस पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन पायात वात येण्याचा संभव असतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे.  

सुरक्षा व खबरदारी -
भटकंती करताना आपण ज्या ठिकाणी जाणार त्याबद्दल ची माहिती आपण आधीच काढलेली असते परंतु निसर्ग हा चमत्कारिक आहे. तो जेव्हडा सुंदर वाटतो तेव्हडच त्याचं रौद्र रूप पण दाखवतो.  संकटे कधी सांगून येत नसतात त्यामुळे आपण आपल्या परीने सदैव तयार असले पाहिजे. भटकंती करताना आपण दोन-तीन च्या ग्रुप मध्ये असू अथवा 20-30 च्या ग्रुप मध्ये, आपल्या पैकी एकाने तरी एक 50 ते 100 फुटाचा दोर नेहमी सोबत बाळगावा.
कधी अचानक पावसाचा जोर वाढतो, दरड कोसळते, नदी नाल्यांत पाण्याचा जोर वाढतो. वर जाताना छोटुसा असणारा ओढ़ा येताना प्रचंड रूप धारण करून आडकाठी करीत वाहत असतो. अश्या वेळेस खचलेला रस्ता वा तुडुंब पाण्याने वाहणारा ओढ़ा ओलांडताना दोराचा उपयोग होतो.
नुसता दोर सोबत असून काय उपयोग? दोर कसा बांधावा याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बेसिक 4 नॉट्स ची माहिती करून घ्यावी, त्या बांधण्याचा सराव करावा व तदन्य लोकांकडून खातरजमा करून घ्यावी. विविध प्रकारच्या नॉट्स ची माहिती वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
फ़क्त आपल्या ग्रुप मधील एका व्यक्तीला थोडा सराव आहे म्हणून केवळ एकाच व्यक्तीच्या भरवशावर जाणे टाळावे. त्याच व्यक्तीला काही दुखापत झाली तर इतरांना सांभाळून घेणारा लागतोच. त्यामुळे सर्व भटाक्यांनी इतर कुणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे. प्रत्येकाने आपापली काळजी स्वतः घेण्यास सक्षम व्हावे. अर्थात हे थोड्या अनुभवानेच शक्य होईल.
भटकंती च्या वेळेस तेथील नागरिकांशी विनाकारण बोलणे टाळावे, त्यांच्यावर, त्यांच्या जीवन पद्धतिवर, त्यांच्या पेहरावावर कुठल्याही प्रकारची टिका टिप्पणी टाळावी. भांडण तंटा करू नये.

भटकंती ला जायच्या ठिकाणचा, पायथ्याच्या वाडीतला एखादा गावकऱ्या चा संपर्क क्रमांक आपल्याकडे असावा. अवघड प्रसंगी त्यांना बोलावता येते.
अंधार पडायच्या आधी पायथ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करावा कारण मग तेथील ट्रांसपोर्ट वाले अव्वाच्या सव्वा भाव लावतात. अगदी उशीर झालाच तर अंधारात वाट शोधण्यासाठी विजेरी (टॉर्च) असलेला बरा म्हणून अगदी एक दिवसाच्या भटकंती मध्ये सुद्धा विजेरी सोबत ठेवावी.
पैकिंग कशी करावी ? -
बॅग मध्ये सामान भरताना तोल सांभाळला जाईल अश्या रीतीने भरावे. आपले सर्व सामान जे भिजण्याची शक्यता वाटते ते ते सर्व प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळून ठेवावे. भटकंती करताना क्वचितच वापरले जाणारे सामान खाली तर पुनः पुनः लागणारे सामान वर ठेवावे. लक्षात असू देत की पाण्याने बॅग भिजली की बॅग मध्ये जाणारे पाणी एकतर चैन मधून अथवा चैन च्या शिलाई मधून खाली उतरते. बॅग च्या कापडा तून झिरपत झिरपत पाणी खाली उतरते व तळाशी जमा होते. त्यामुळे अधिकचे कपडे, अंथरूण / स्लीपिंग बैग असे हलके सामान जे आपण नेहमी सगळ्यात खाली ठेवतो ते भिजण्याची शक्यता फार जास्त असते. त्यामुळे कपडे व अंथरुण भरताना नेहमी व्यवस्थित जाड अश्या कमीत कमी दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवाव्यात.
एकच भली मोठी पाण्याची बाटली घेण्या पेक्षा दोन बाटल्या असाव्यात जेणेकरून बॅग मधील सामानाचा तोल सांभाळला जाईल.
दोर, औषधे, खाऊ, पाणी असे सामान पटकन काढता येईल अश्या प्रकारे वरच्या कप्प्यात ठेवावे. खाण्याचे पदार्थ सहजा सहजी दिसतील अश्या प्रकारे कधीही ठेवू नयेत जेणेकरून माकडे त्याकडे आकर्षिली जाणार नाहीत व तुमचा खाऊ माकडांपासून सुरक्षित राहील.
कॅमेरा कापडात गुंडाळून ठेवू नये कारण हवेतील आर्द्रता शोषुन घेतल्यामुळे कापड भिजते व या दमटपणामुळे कॅमेरा मध्ये बूरशी निर्माण होउ शकते. कॅमेरा बॅग मध्ये नेहमी आर्द्रता शोषून घेणाऱ्या सिलिका जेल च्या पुड्या ठेवाव्यात. पावसात फ़ोटो काढण्याचा मोह आवरता येत नसेल तर सोबत छत्री असावी.
निसर्ग नियम पाळणे -
आपण निसर्गा च्या सहवासात असताना आपल्याकडून निसर्गाची कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये. झाडाच्या फांद्या तोड़ने, झुडुपे मुळासकट उपटणे, कुठल्याही प्रकारचा कचरा करणे हे सर्वतोपरी टाळावे. प्रत्येक भटक्याने आपल्या सोबत एक पिशवी बाळगणे गरजेचे आहे. सहजा सहजी विघटन न होऊ शकणारे जे जे काही असेल ते ते सर्व पुनः आपल्या सोबत आणून शहरातील कचरा कुंडीमध्ये टाकावे.
बरेच जणांना सवय असते की ते शौचाला जाताना नेलेली पाण्याची बाटली फेकून देतात. केवळ शौचाला बाटली नेली म्हणून फेकून देण्याची सवय बऱ्याच जणांना असते. या बद्दल भावनेच्या आहारी न जाता प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
डोंगरावर चढल्यावर पुनः खाली यायचेच आहे त्यामुळे काहीतरी अचाट साध्य केल्याचा अहंकार वरच ठेवून या. आपल्यामुळे कुणाला स्वतःची कामे टाकून आपला जीव वाचवण्यासाठी येऊ लागू नये ह्याची काळजी प्रत्येकाने आपापली घ्या. अर्धवट माहितीच्या आधारे पराक्रम गाजवू नका. निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाच्या सन्निध्यात स्वतःचे सुख शोधा, निसर्गाचे नियम पाळा, निसर्गाचा आदर करा. जमेल तेव्हडा इतिहासाचा, भूगोलाचा, सह्याद्रीचा, तेथील वन्य जीवनाचा अभ्यास करा पावसाळी भटकंती चा योग्य तऱ्हेने आनंद घ्या.
- समीर