Pages

Tuesday 10 April 2012

महाबळेश्वर - निसनी ची वाट - जावळी - प्रतापगड - रड्तोंडी घाट - पार - प्रतापगड - वाडा कुंभरोशी - पोलादपूर


जावळी म्हणजेच जयवल्ली, 'येता जावळी जाता गोवली' म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. लहानपणा पासून वाचनात आलेली, इतिहासात अजरामर झालेली जावळी. तिला भेट देण्याची, तिथले निबिड अरण्य पहायची, त्या अरण्यात वाटचाल करायची मनात दडलेली इच्छा आता पूर्ण होण्याची वेळ आली होती. प्रतापगड - जावळी चा ट्रेक करण्याचा बेत आखला होता. अनुप ने आधीच तो ट्रेक केलेला पण तरीही पुन्हा यायची तरारी केली आणि आम्ही मस्त प्लान केला. महाबळेश्वराचे दर्शन घ्यायचे, जावळी, मोर्यांचा वाडा पहायचा, जावळीच्या सभोवतालच्या घाट वाटा  धुंडाळून काढायच्या. शिवाजी राजांनी जावळी वर हल्ला करताना वापरलेली निसनी ची वाट, अफझल्याने पार गावात उतरत असताना त्याच्या सैनिकांच्या नाकी नउ आणणारा रडतोंडी चा वळणा-वळणाचा, निबिड अरण्याने वेढलेला घाट, शिवरायांनी रयतेच्या सोयी करिता कोयनेवर बांधलेला दगडी पूल, पार गावातील पौराणिक रामवरदायिनी देवीचे मंदिर पहायचे, अफझलखान वधाने पावन झालेला प्रतापगड गाडीरस्ता न घेता चढायचा-उतरायचा जुन्या वाटेने, मधु मकरंद गडाला भेट द्यायची आणि पार घाटाने कोकणात उतरायचं असा एकूण बेत. वाह वाह!! क्या बात. सगळं एकदम मस्तच. लागलीच सगळी माहिती गोळा केली. एस टी चे वेळापत्रक पहिले, मित्रांना प्लान सांगितला आणि दिवस ठरवला. एप्रिल ५,६,७ च्या सुट्टीत जाऊन यायचे. या परिसरात गाडी प्रवासाची वानवा असल्या मूळे वेळापत्रक थोडे जरी चुकले तरी गडबड होण्याची शक्यता होती. गावातून एस टी च्या दिवसाला २-३ फेर्याच होतात.

निसर्ग भ्रमण च्या वेबसाईट वर माहिती दिली होती त्यामुळे २ नवीन चेहरे सोबतील आले, काही जुन्या सवंगड्यांनी (अनुप, राहुल, मंदार) टांग मारली. हो-नाही करत एकूण ५ जण झाले - पराग, ज्ञानेश्वर, अजित, ताप्ती आणि मी. गुरुवारी रात्री १० वाजता मुंबई सेन्ट्रल एस टी डेपो ला भेटायचे ठरले. पण हाय रे कर्मा... तीन दिवसांच्या सुट्टी असल्यामुळे मुंबई - महाबळेश्वर एस टी फुल होती. बसायला जागाच नाही. एशियाड असल्यामुळे उभ्याने घेऊन जायला सुद्धा वाहक तयार नाही. लागलीच कोकणात खेड ला जाणारी एस टी पकडली. पनवेल - पेण रामवाडी - महाड करीत आमचा लाल डब्बा पोहोचला पोलादपूर ला. बोरीवली हून सुटणारी महाबळेश्वर ची एस टी देखील सोबतीलाच होती त्यामुळे पटकन उतरलो आणि झटकन दुसऱ्या एस टी मध्ये चढलो. बसायला जागा नव्हती परंतु ठरल्या वेळेस महाबळेश्वर गाठणार होतो. उभ्याच प्रवास करून सकाळी ५ वाजे दरम्यान महाबळेश्वर ला पोहोचलो आणि दमल्या जीवांना थोडा आराम करू दिला. एस टी डेपो मध्येच पथारी टाकली आणि आडवे झाले सगळे. आपल्याला काही झोप येत नव्हती त्यामुळे तोंडावर पाणी मारले, सकाळच्या नाश्त्याची सोय केली आणि गाडीचा बंदोबस्त केला.

महाबळेश्वर येथील कृष्णा माई चं पुरातन देऊळ. 
सकाळच्या गार वाऱ्यात आम्ही महाबळेश्वराच्या दर्शनास निघालो. महाबळेश्वरला वंदन केले, शिवरायांनी जिजाऊची सुवर्ण तुला केली ते स्थान पहिले, मोर्यांनी अर्पण केलेला सोन्याचा मुकुट पहिला, अतिबळेश्वरचे देऊळ, कृष्णा, कावेरी, वेण्णा, सावित्री, गायत्री या पंच नद्यांचा उगम, त्या पलीकडे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी पहिला मारुती पहिला. तेव्हड्यात डोक्यात प्रकाश पडला. आज तर हनुमान जयंती. वाह वाह!! योग्य समयी दर्शन जाहले. पौराणिक कृष्णेच्या देवळाकडे निघालो. तेथून पूर्वेला दरीत कृष्णेचे निळेशार संथ पाणी, जोर खोऱ्यात बांधलेले धारण, त्याशेजारील गोळेवाडी, बलकवडी गाव, कमळगडाचा माथा आणि त्यामागून दर्शन देणारा सूर्यदेव. त्या कोवळ्या सूर्य किरणात न्हाऊन निघालेले काळ्या पाषाणातले ते पुरातन मंदिर, त्याचे जीर्ण अवशेष पहिले, सभोवताली नजर टाकली. सुखावल्या मनाने निघाली स्वारी परतीच्या वाटेवर. पण हि वाट अडवून धरली ती लालबुंद फळांच्या शेताने. म्हातारीने ही लालेलाल Strawberry शेतातून खुडून देण्याची तयारी दाखवली. किलोभर strawberry भरून घेतली आणि स्वारी निघाली पुढे. गाडीवान वाट पाहत थांबला होताच. 'बरीच वाट पाह्यला लावलीत' असं म्हटल्या बरोबर २ strawberry त्याच्या हातावर टेकवल्या आणि आम्ही निघालो एल्फिन्स्टन च्या कड्यावर. वाटेवरचा एक ससा टुणकन उडी मारून दिसेनासा झाला. दरे गावात सासुरवाडी असलेल्या म्हातार बुवांकडे चौकशी केली निसनीच्या वाटेची.  म्हणाले, "इथ कुटं आलं तुमी? ती वाट तर भलतीकडेच राह्यीली. मागे जंगलातून जातीय वाट. तुमी फार म्होरं आलं. मग फिरा, इथून जाऊ नगा."
एल्फिन्स्टन पोइंत येथून दिसणारा सहय कडा. किल्ले कांगोरी, चंद्रगड, दुर्गाडी, तोरणा, राजगड 
अनुप ने तर हीच वाट सांगितली होती मला. जास्तच अडवणूक व्हायला लागली तेव्हा हुज्जत न घालता त्यांना सांगितले कि आम्ही जाऊ वाट शोधात रानातून अन तडक निघालो एल्फिन्स्टन पोइंत कडे. म्हतारबुवांचा नाईलाज झाला. क्षणार्धात नजर खिळली समोरच्या प्रतापगडावर. बुलंद प्रतापगड... शिवरायांनी बांधलेला. त्या तिथे जावळी दिसतेय, पलीकडे मधु-मकरंद गड. डावीकडे हिरवागार प्रदेश अन उजवीकडे उत्तुंग बेलाग कडे, सुळके. आनंद गगनात मावेनासा झाला. राजगड, तोरणा दिसला, त्याच्याच अलीकडे दुर्गाडी / मोहनगड, शेजारीच कोकणातला कांगोरी उर्फ मंगळगड आणि चोहोकडून काड्यांनी वेढलेला, फक्त डोकं वर काढलेला चंद्रगड उर्फ ढवळागड, सभोवताली महाबळेश्वराचा भेदक कडा. हा नजराणा डोळ्यात साठवून, मनसोक्त फोटो काढून आम्ही ट्रेक सुरु केला.
निसनीच्या वाटे वरून दिसणारे विहंगम दृश्य
डोंगर कड्यावरून वळसा मारत, वर खाली करत आम्ही निघालो डावीकडे. उजव्या बाजूला हजार फुट खोल दरी, दूरवरचा हिरवाकंच गालीचा, सकाळचा गार वारा, ऊरात जावळीची ओढ - असं मस्त वातावरण. एक डोंगराची सोंड सरळ खाली दरे गावात उतरते तीच निसनीची वाट. तिथपर्यंत असंच चालत राहायचं. पण ह्या वाटेला पोहोचण्यासाठी काट्या-कुट्यातून वाट काढावी लागली, अनेक ढोरवाटांपैकी नेमकी शोधावी लागली, रानातून माग शोधावा लागला, खूप मोठा वळसा मारावा लागला. म्हातार बुवांचे बोल खरे ठरले. आम्ही खूपच पुढे आलो होतो. परंतु मनसोक्त भटकंतीच तर करायची होती आम्हाला. मजल दरमजल करीत तासाभरात पोहोचलो धारेवर. मध्ये एका ठिकाणी रानगव्या ची चाहूल लागली, बिबट्याची विष्ठा दिसली.
निसनी च्या वाटेवरून दिसणारे जवळी चे खोरे. पलीकडे प्रतापगड.
जावळी वर कब्जा करताना शिवाजी राजे स्वतः काही सैन्यानिशी याच निसनीच्या वाटेने जावळी मध्ये उतरले होते. आपणही याच वाटेने जाणार, जावळीचा मुलुख पाहणार, मन सुखावले, भरभरून आले. आता खालचे दरे गाव एकदम नाकासमोर होते. आम्ही निसनी ची वाट उतरू लागलो होतो. एकदम सोप्पी अशी ती नाही. एकच माणूस जाईल अशी पायवाट, काही ठिकाणी नुसता मातीचा घसारा. थोडा जरी तोल गेला, पाय घसरला तरी खालच्या दरीत लोटांगण व्हायची भीती. छोटासा, सोप्पा असा कातळ कडा उतरून पुढे आलो तेव्हा दगडात कोरलेली, शेंदूर फसलेली एक मूर्ती दिसली. हीच तर खूण होती आणि आम्ही योग्य वाटेवर होतो. ताप्ती बुड टेकवत हळू हळू उतरत होती. ज्ञानेश्वराने मध्ये मध्ये तिला साथ दिली. बाकी सगळे वाकबगार. उन चढत होतं आणि आम्ही एका ठिकाणी विश्रांती साठी बसलो. खालून २ बापडे वाट चढून येताना दिसले, जोर गावात निघाले होते. त्यांच्याशी थोड्या गप्पा केल्या, माहिती काढली अन लागलो पुढच्या वाटेला. ताप्ती ला येथे गुडघ्यात थोडा त्रास जाणवू लागला आणि तो वाढतच गेला. बाकीच्यांना पुढे पाठवून मी तिच्यासोबत हळूहळू उतरत होतो. वेळापत्रक कोलमडत होतं. हि वेळ भरून काढण्यासाठी पायी जाण्याऐवजी गाडी करावी म्हणून गाडीवानाला फोन केला तर तो देवळात आरती करत होता. थोड्या वेळात फोन करतो म्हणाला पण मी जरासा खाली उतरलो, अन फोन चं नेटवर्क मात्र गेलं. पराग अन अजित ने दरे गावात जाऊन जेवणाची सोय केली होती. गावात मुबलक पाणी. हात पाय धुतले अन झुणका भाकरीवर ताव मारला. सोबत आणलेली जिलेबी संपवली. गावकऱ्या कडून थंडगार पाणी मिळाले. गाडीची काहीच सोय होऊ शकली नाही. दुपारचे १२ वाजले होते. निघालो चालत जावळी च्या दिशेने. किलोमीटर भर चाललो असेन आणि दिसली 'वरची जावळी'. पुढे 'मधली जावळी' अन त्यापुढे 'खालची जावळी'. ह्या ३ वाड्यांची मिळून होते ती 'जावळी'. कालभैरवाचे देऊळ आले. हे मोर्यांचे कुलदैवत. देवळात कालभैरवाची, हनुमंताची मूर्ती आहे. आतील एका भिंतीला हरणाची शिंगे लटकवलेली आहेत.  त्या मागच्या टेकाडावर मोर्यांच्या वाड्याचे अवशेष. अवशेष म्हणजे फार काही नाही, वाड्याचे जोते पण शिल्लक नाहीत एव्हडेच दगड. देवळात दक्षिणा दिली अन आम्ही निघालो पुढे. जावळी फाट्यावर आलो अन बस ची वाट पाहत थांबलो. ४:३० ची बस मिळणार होती प्रतापगडी जायला.
दरे गावर उतरणारी हि डोंगर धार म्हणजेच निसनी ची वाट
ताप्ती ला त्रास जाणवत होता म्हणून मग बेत थोडासा बदललेला. strawberry चं शेत होतं, ताव मारला मस्त. शेतकऱ्याशी चांगलीच ओळख झाली. ५:१५ होऊन गेले तरी बस काही आली नाही म्हणून मग टेम्पो पकडला अन स्वारी निघाली प्रतापगडी. ओळखीच्या गाईड (आनंदा) शी बोलून सरकारी निवास स्थानात निवासाची सोय केली होती. गडाच्या महा दरवाज्यातून आत प्रवेश केला, माची वरचा अफ्झल्ल्या बुरुज पहिला, जुन्या वाटेने वर चढलो, तुळजा भवानी चे दर्शन घेतले, निवास स्थानी गेलो, अंघोळी आटोपल्या. आज हनुमान जयंती तर होतीच पण शिव-निर्वाण दिन पण होता. आई तुळजा भवानी ची पालखी निघणार होती अन आम्हाला आरतीचा लाभ मिळणार होता. सगळा योग कसा जुळून आला होता. गोंधळ झाला, तुळजा भवानी चे मनोभावे दर्शन झाले, आनंदा सोबत थोड्या गप्पा झाल्या, नवीन माहिती मिळाली. सकाळच्या प्रवासाची तजवीज केली अन त्या नंतर सुग्रास भोजनाचा कार्यक्रम. वांग्याचे भरीत, झुणका, भाकरी, भात, वरण, पापड, मिरचीचा ठेचा. पौर्णिमेच्या चंद्राच्या लक्ख प्रकाशात शिवरायांचा अश्वारुड पुतळा न्हाऊन निघाला होता. मनोभावे त्यांचं दर्शन घेऊन मग झोपेला कवटाळून घेतलं.

रडतोंडी घाट.
पहाटे चौघे लवकर उठलो, ताप्ती झोपली होती, गड उतरून खाली आलो, हॉटेलात चहा घेतला, भजी खाल्ली. गाडीवान ७:२० वाजता आला, आम्ही चौघे मेटतळे गावा नजीक रडतोंडी घाटाच्या च्या फाट्या जवळ उतरलो अन लागलीच ट्रेक सुरु केला. ८ वाजले होते. चांगला मोठाला रस्ता... बैलगाडी जाईल एव्हडा. चौकोनी दगडातून बांधून काढलेला पण वळणा-वळणाचा अन उतार असलेला. मध्येच पायऱ्या बांधलेल्या, थोडं उतरून गेल्यावर मग पुढची वाट मात्र दाट जंगलातून. असं अरण्य या आधी कधीच पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. अफझलखानाच्या सैन्याने याच रड्तोंडी घाटाने जावळी च्या प्रदेशात पाय ठेवला होता आणि याच रड्तोंडी घाटाने त्यांचे हाल हाल केले होते. असा हा ऐतिहासिक घाट. निवांत भटकंती सुरु होती आमची. तऱ्हे तऱ्हेचे पक्षी - बुलबुल, शिंजीर, गरुड, रान कोंबडा, हरियाल पहिले, एका ठिकाणी रान डुकराच घरट पाहिलं.  घाट संपताच डांबरी रस्ता आडवा लागला आणि गोगलेवाडी आली. हा रस्ता जातो थेट हातलोट गावात - मधु मकरंद गडाकडे. येथून उजवीकडे गेल्यावर ५०० मीटर वर ऐतिहासिक असा कोयना नदीवरील शिवकालीन पूल लागला. कोयनेचं पाणी आटलं होतं. पुलाची बांधणी पाहिली, फोटो काढले. ३०० वर्षे होऊन देखील अजून जासाच्यातासच उभा आहे हा पूल. थोडं अजून पुढे गेल्यावर पार गावात आमचे आगमन झाले. येथूनच कोकणात जाण्यासाठी पार घाट आहे जो खाली किनेश्वर गावात उतरतो. तेथून गाडीने पोलादपूर गाठता येतं.

Add caption

शिवाजी राजांच्या आखत्यारीत प्रजेच्या कल्याणासाठी बांधलेला ३०० वर्षापूर्वीचा कोयने वरील पूल.
पार गावातील श्री राम वरदायिनी व श्री वरदायिनी चे मंदिर.
पार गाव तसे जुनेच. येथेच श्री वरदायिनी व श्री राम वरदायिनी देवींचे नुकतेच जीर्णोद्धार केलेले सुंदर मंदिर आहे. हात पाय धुतले, देवीचे दर्शन घेतले, मंदिराचे सुबक नक्षीकाम पहिले, लोणचे - ठेपले खाल्ले, पाणी भरून घेतले व चाललो पुन्हा प्रतापगड च्या वाटेवर. सकाळचे १०:४० झाले होते. गडावर जाण्याची वाट विचारून घेतली. पार गावातूनच नळावाटे प्रतापगडावर पाण्याची सोय केली जाते. वरदायिनी मंदिराच्या थोडं पुढे जाऊन उजवीकडे लाईट च्या खांबांच्या दिशेने चालायला लागलो. नाका समोरची वाट पकडायची, इथे-तिथे जायचे नाही  अशी सक्त ताकीद गावकऱ्यांनी दिली होती. वाटेवरूनच पाण्याचे नळ जातात. वाट थोडी उभीच होती परंतु झपाझप पाउले टाकीत आम्ही अर्ध्या तासात अफ्झल्ल्या च्या कबरीकडे पोहोचलो. आजूबाजूला अनधिकृत बांधकामाला उत आलेला. सध्या तेथे कोणासही जाण्यास मज्जाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते सर्व बांधकाम तोडण्याचा आदेश देऊन देखील राज्य सरकारने त्याचे पालन केले नाही. आम्हास पाहून पोलिसांनी अडवले, शेजारचा रस्ता दाखवला. हि जागा म्हणजे जनीचा टेंब. येथेच राजांनी अफ्झल्ल्या साठी शामियाना उभारला होतं, येथेच त्याचा कोथळा बाहेर काढला होता. प्रतापगडाहून येथल्या सर्व हालचाली व्यवस्थित टिपता येतात. अफझलखान याच वाटेने पार गावातून वर आला होता महाराजांना भेटावयास. येथून प्रतापगड चे छान फोटो मिळाले. ११:३५ झाले अन आम्ही प्रतापगडाच्या दरवाज्यात पोहोचलो. एव्हड्या लवकर आम्ही परतलो होतो याचे आश्चर्य वाटले. मधु मकरंद गडाला भेट देण्याच्या कार्यक्रमाला मूठमाती दिली होती. प्रतापगड पिंजून काढावा म्हणून मग गड फेरी ला निघालो. तसा तो आधी भेट देऊन झालेला. 

जनीच्या टेंभा वरून दिसणारा प्रतापगड.
प्रतापगडाची माची. 


प्रतापगडाला येण्यासाठी पूर्वीच्या २ मुख्य वाटा. एक येते पार गावातून जनीच्या टेंभावरून तर दुसरी वाडा -कुंभरोशी हून. प्रतापगडाचा महा-दरवाजा पश्चीमाभिमुखी आहे. २ बुरुजांच्या मध्ये असून सहजा-सहजी तो दिसून येत नाही. आणि तेथे जायला पण तटबंदीच्या माऱ्यात यावे लागते. त्यामुळे तो सर्व प्रकारे सुरक्षित असा. लाकडी दरवाजा अजूनही शाबुत आहे. महा-दरवाज्यातून आत शिरताच समोर माची दिसते आणि त्यावरचा भला मोठा चिलखती धाटणीचा अफ्झल्ल्या बुरुज. पूर्वी ढासळलेला बुरुज पुन्हा बांधून काढलेला. सिमेंट ने नव्हे तर चुना - गूळ - उडीद यांच्या मिश्रणाने. माचीवरच्या तटबंदीमध्ये २ शौचकूप अन १ चोर दिंडी आहे. पाठमोरं फिरून पुढे गेल्यावर २ बुरुजांच्या मध्ये एका मागे एक असे २ दरवाजे. त्याच्या दोन्ही बाजूस शरभ चित्रे. वर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या. हि वाट जुनी अन नगारखान्यात जाणारी. परंतु सध्या तेथे कचरा टाकून हि वाट बंद केलेली. बुरुजाची तटबंदी फोडून दुसरा रस्ता तयार केलेला. उजवीकडे गडावरील सगळ्यात मोठा कातळात खोदलेला पाण्याचा तलाव. शिवकालीन गडांवरचे हे एक वैशिष्ठ्य.  रस्त्याच्या दुतर्फा खाण्या पिण्याची दुकाने, घरे. हि सगळी घरे पूर्वापार पासून गडावर नेमलेल्या बलुतेदारांची. तुळजा भवानी चे देऊळ म्हणजे रायगडावरच्या जगदीश्वर मंदिराची छोटी प्रतिकृतीच. गाभाऱ्याच्या वरचा भाग तांब्याने सजवलेला व कळस सोन्याने मढवलेला. नगारखाना, सभामंडप, त्या समोरची दीपमाळ, गाभाऱ्यातील तुळजा भवानी ची मूर्ती, त्या समोर ठेवलेली मराठा शिपायाची तलवार, त्यावर कोरलेले नाव - कान्होजी मोहिते हंबीर राव ... सर्वच प्रेक्षणीय. येथेच आहे एक हस्तकला केंद्र आणि जवळच काही जुन्या तोफा ठेवल्या आहेत. येथूनच मागे एक रस्ता जातो पाण्याच्या बुरूजावर. बुरुजाच्या बेचक्यात, तटबंदी शेजारीच खोदलेला पाण्याचा मोठा तलाव.

देवळा पासून पुढे गेल्यावर हनुमानाचे एक देऊळ आहे. तेथून वर अजून एक दरवाजा. त्यावर देखील शरभ चित्रे कोरलेली. आत गेल्यावर डावीकडे एक भला मोठा चौथरा लागला ( २० फुट X ६० फुट ). हि राजांची सदर. त्या शेजारीच केदारेश्वर महादेवाचे मंदिर. मागे जाणारी वाट रेडक्या बुरूजा कडे जाते. त्यात एक चोर दिंडी. गडावरील एकूण ६ चोर दिन्ड्यांपैकी  हि एकच खुली असून बाकी सगळ्या बुजल्या आहेत.

गडाच्या माथ्यावर शिव छत्रपतींचा ब्राँझ ने बनवलेला अश्वारुड पुतळा आहे. त्या शेजारीच राजांच्या वाड्याचे जोते दिसतात. पलीकडच्या तटबंदी मध्ये २ शौच कूप आहेत. खालच्या बाजूला शासकीय विश्रामधाम अन त्या मागील झाडी मध्ये एका दगडावर मारुती अन दुसऱ्यावर घोरपडीचे चित्र आहे.  गडाच्या उत्तरेच्या दिशेला तटबंदीलगत २ पाण्याची तळी आहेत. गडाची तटबंदी एकदम शाबूत आहे. छत्रपती श्री प्रतापराव भोसले  यांच्या विनवणी मूळे इंग्रजांनी प्रतापगडा समवेत सातारा, परळी, खेलंजा (केंजळगड) या गडांना धक्का लावला नाही, नासधूस केली नाही. महाराणी ताराबाई यांनी काही काळ स्वराज्याची राजधानी प्रतापगडावर हलवली होती.

प्रतापगडावरील श्री छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा. 
प्रतापगड पाहून झाला अन आम्ही दुपारी १ वाजे दरम्यान गडावरून उतरण्यास सुरुवात केली. मोठी सुट्टी असल्या कारणाने परतीच्या प्रवासात जागा मिळण्यास अडचण होईल म्हणून मग बेत थोडा बदलला होता. निसनी ने उतरतानाच उशीर झाल्यामुळे मधु मकरंद गडाला भेट व पार घाट उतरण्याची कल्पना पार धुळीस मिळाली होती. वाडा कुंभरोशी ला जाणाऱ्या वाटेने उतरायचे व पुढे गाडीने पोलादपूर ला जायचे निश्तित केले. वाट चांगली मोठी, पायऱ्यांची व सोप्पी, जंगलातून जाणारी. १० मिनिटात शिवसृष्टी जवळ पोहोचलो, जेवणाची सोय केली, शिवसृष्टी पाहून मग मस्त जेवणावर ताव मारला. आणि तृप्त पोटाने आम्ही निघालो वाडा-कुंभरोशी कडे. संध्याकाळी ७:३० ची बस होती आणि अजून बराच अवकाश होता. तो पर्यंत अजून एक strawberry चं शेत गाठलं, स्वतः ती खुडून काढली, थोडी तोंडात टाकली अन सगळ्यांनी मिळून जवळपास १० किलो strawberry खरेदी केली. आता पुन्हा आम्ही आलो वाडा ला परंतु वाहनाचा पत्ताच नाही. पोलादपूर कडे कूच करायचे होते, खूप वेळा नंतर टेम्पो पकडला. झोप काढत काढत पोलादपूर ला पोहोचलो ६:५० वाजता. बस ची वाट बघत बसण्या ऐवजी दुसरे काही साधन पाहावे म्हणून हमरस्त्यावर आलो. पण तासभर वाट पाहून आम्हाला मुंबई ला जाणारी एस टी मिळाली अन बसायला जागा देखील. झोप काढत रात्री १:३० वाजता मुंबई आणि २:३० वाजता घरी पोहोचलो. पुढचा दिवस ( रविवार ) झोप काढण्यात आणि प्रतापगडाच्या इतिहासावर मनन करण्यात गेला. नवीन जागा पहिल्या, नवीन लोकांच्या ओळखी झाल्या, नवीन माहिती मिळाली. पुन्हा एकदा प्रतापगडी जाण्याची, जावळी चा प्रदेश अनुभवण्याची, राहिलेल्या जागांना भेट द्यायची ओढ लागली. लवकरच मधु मकरंद चा नवीन बेत आखला जाईल व अमलात आणला जाईल.

- समीर पटेल 

1 comment:

  1. प्रवासच वर्णन वाचून तुझ्या बरोबर जाऊन आल्या सारख वाटलं अगदी समीर ......धन्यवाद

    ReplyDelete