Pages

Tuesday 13 September 2016

नितांतसुंदर पांडवगड

आडवाटेवरचे किल्ले करायचे झाले तर अनेकांच्या मनात सहजा सहजी न डोकावणारा परंतु अवशेषांनी संपन्न असलेला प्राचीन किल्ला म्हणजे वाई जवळचा पांडवगड. वाई शहरापासून जवळच वाई - मांढरदेवी रस्त्यावर धावडी गावानजीक असलेला नितांतसुंदर असा पांडवगड सध्या खाजगी आक्रमणाच्या विळख्यात सापडलेला किल्ला आहे. गडाचा वरचा भाग म्हणजे जवळपास २४ एकर जागा एक पारशी गृहस्थ शेर वाडिया यांच्या मालकीची होती व ते जवळपास २० ते २२ वर्षे एकटेच त्या ठिकाणी वास्तव्यास होते. २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले व त्या नंतर गडावरील सदर जागा mapro कंपनी च्या ताब्यात आहे. सध्या कंपनी तर्फे तीन माणसे गडावरील घरात पहारा देण्यासाठी नियुक्त केलेली आहेत. खाजगी मालमत्ता असल्याने रात्री गडावर मुक्काम करता येत नाही. पायथ्याच्या गुंडेवाडी गावातील एक मनुष्य - श्री बाळू कोंडके रोज गडावर एक फेरी मारतात. डोंगरावरील जंगलात रानडुक्कर, बिबट्यांचा वावर आहे. गड व्यवस्थित पहायचा असेल तर दिवाळी नंतर जाणे उत्तम जेणेकरून गडावरील झाडोरा बऱ्यापैकी सुकलेला असतो व पायवाट ठळक दिसते. 

पांडवगडावर जाण्यासाठी मुख्य दोन वाटा आहेत. एक मेणवली गावातून चढणारी, जवळपास अडीच तासात गडावर पोहोचवणारी, उभ्या चढणीची वाट आणि दुसरी धावडी गावापुढील गुंडेवाडी येथून श्री. बाळू कोंडके यांच्या घराशेजारून जाणारी, तासाभरात गडावर पोहोचवणारी सोपी वाट. ही दुसरी वाट उभ्या चढाई ची असली तरी वळणदार रस्ता व दाट जंगल यामुळे चढण्यास सोयीची पडते. सकाळी लवकर उन्हे चढायच्या आत आपण चढाई ला प्रारंभ केला तर उत्तम.  ह्या मळलेल्या व वळणा वळणाच्या वाटेने आपण लगेचच उंची गाठतो व जवळपास तीस ते चाळीस मिनिटात आपण गडाच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. येथून आपल्याला मांढरदेवीचा डोंगर व भोवतालचा मुलुख दिसतो. पुढे अजून अर्धा तासाच्या चढाई नंतर आपण गडमाथ्यावर येतो. वाटेत काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. एकेकाळच्या पारशी गृहस्थांच्या घरातील mapro कंपनी चे पहारेकरी आपले स्वागत करतात. येथे थोडा आराम करून आपण गड फेरीला निघालो कि अनपेक्षित असे बरेच काही दाखवून पांडवगड आपले समाधान करतो. 

सर्वप्रथम आपण गडाच्या बालेकिल्ल्याला डावीकडे ठेवून पुढे निघालो कि डावीकडे काही पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या टाक्यातील पाणी थोडे खराब असून पहारेकरी त्यांचा वापर अंघोळीसाठी करतात. पुढच्या दुसऱ्या टाक्यातील पाणी स्वच्छ व पिण्यालायक असून त्यात जंगली जनावरे पडू नयेत म्हणून त्यास जाळीचे कुंपण केले आहे. हे खांब टाके असून ते हा गड शिलाहारकालीन असल्याचा पुरावा देतो. येथील पाणी वर्षभर उपलब्ध असते. येथे आपल्या बाटल्या भरून पुढे निघालो कि डावीकडे अजून ३ पाण्याची टाकी दृष्टीस पडतात परंतु त्यापैकी कुठल्याच टाक्यातील पाणी पिण्यास योग्य नाहीये. वाटेने पुढे जाताना उजवीकडे कड्या लगत छोट्या तटबंदीचे अवशेष दिसत राहतात. येथूनच आपल्याला धोम धरण व त्यामागील जलाशयाचे मनोहारी दर्शन होते. 

बालेकिल्ल्याला डावीकडे ठेवत याच वाटेने पुढे गेल्यावर उजवीकडे एक वाट खाली उतरताना दिसते. खडकात खोदलेल्या काही पायऱ्या आणि दरवाज्याचे अवशेष पार करून हि मळलेली वाट खालच्या पठारावरील भैरवनाथ मंदिराकडे व तेथून पुढे पश्चिमेकडील मेणवली गावात उतरते. दरवाजा पाहून पुन्हा आल्या वाटेने कड्याखाली यायचे व कड्याला डावीकडे ठेवत एक प्रदक्षिणा मारायची. काही अंतरावर डावीकडे कातळात खोडलेली एक छोटीशी गुहा व त्यात शेंदूर लावलेले दगड देव दिसतात. उजवीकडे खाली पाण्याची दोन टाकी आहेत. त्यातील एक बऱ्यापैकी  बुजलेले असून दुसऱ्यात स्वच्छ पाणी आहे. आणखी पुढे गेल्यावर अशीच अजून एक गुहा असून त्याचे खांब बऱ्यापैकी झिजले आहेत. गुहे शेजारीच कड्यात खोदलेले पाण्याचे टाके तर उजवीकडे खाली दोन पाण्याची सुकलेली टाकी आहेत. यात उतरण्यासाठी खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. आपली प्रदक्षिणा अशीच पूर्ण करत पुढे गेल्यावर डावीकडे भक्कम तटबंदी दिसते. येथून थोड्याच अंतरावर आपल्याला डावीकडे एक खणखणीत बुरुज दृष्टीस पडतो. या बुरूजाजवळूनच बालेकिल्ल्याला जाण्याची वाट आहे. एका मागोमाग असे दोन दरवाज्यांचे अवशेष असून त्यांची कमान शाबूत नाहीये. चिंचोळ्या वाटेने पुढे जाताना डावीकडे  जवळपास १८ फुट उंचीची भक्कम तटबंदी उभी असते. साधारण ४० फुटांवर पुढे उजवीकडे अजून एक बुरुज आपला मार्ग अडवतो. पुन्हा चिंचोळ्या वाटेने मार्गक्रमणा करत व एकूण तीन दरवाज्यातून आपला प्रवेश बालेकिल्ल्यावर होतो. डावीकडे तटबंदी लगतच जेमतेम तग धरून असलेले हनुमानाचे मंदिर असून वीरासानातील मूर्ती लक्षवेधक आहे. मंदिरा समोरच उत्तम स्थितीतील एक चुन्याचा घाणा आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणारे चुन्याचे मिश्रण बनवण्यासाठी याचा वापर होत असावा. येथून पुढे जाणारी एक वाट पांडजाई देवीच्या मंदिरापाशी घेऊन जाते. कधीकाळी जीर्णोद्धार केलेले हे मंदिर सध्या बरीच पडझड झालेल्या अवस्थेत असून छप्पर गळके आहे. मंदिरा शेजारीच एक समाधी, दगडी स्तंभ, दगडी दिवा, दगडी पात्र, एक शिवलिंग व नंदी असून आत पांडजाई देवीची सुबक मूर्ती आहे. देवीचे दर्शन घेऊन आल्या वाटेने पुन्हा दरवाज्य पाशी येउन आपली बालेकिल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी डावीकडच्या वाटेला लागायचे. हि वाट आपल्याला पुन्हा पारशी गृहस्थाच्या घरी घेऊन जाते. जाताना उजवीकडे काही पाण्याची टाकी व एक भला मोठा तलाव दृष्टीस पडतो. ९ पाण्याची टाकी व एक भला मोठा तलाव असून देखील केवळ एकाच टाक्यातील पाण्याला उपसा असल्यामुळे व नेहमीच्या वापरात असल्यामुळे पिण्याजोगे आहे. भरपूर पाण्याचा साठा व घरांचे अवशेष पाहून असे जाणवते की कधीकाळी ह्या किल्ल्यावर बराच राबता असला पाहिजे. संपूर्ण गडफेरी करायला दीड तास पुरतो. 

पारशी वाड्यात मुक्कामाची परवानगी नाही व गडावर कुठेच मुक्कामाला सोय नाहीये त्यामुळे आपली पावले परतीच्या प्रवासाला वळवायची. आल्या वाटेने गुंडेवाडी ला पोहोचायला पाउण ते एक तास लागतो. अश्या प्रकारे एकूण साडेचार ते पाच तासात आपला पांडवगड पाहून होतो. गुंडेवाडीतून वाई ला जाण्यासाठी दर दीड तासाला महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसेस उपलब्ध असतात. 

असा हा वाकड्या वाटेवरचा प्राचीन पांडवगड त्याच्या अंगा - खांद्यावरचे विविध अवशेष दाखवून त्याची सफर सार्थ ठरवतो. मोठ्या सुट्टीत पांडवगड ला जोडून भुईंज जवळचे चंदन - वंदन हे जोडकिल्ले व पाचवड जवळचा वैराटगड करता येऊ शकतो. पायथ्याचे धावडी गाव बऱ्यापैकी सधन असून ह्या गावात मुक्काम करायचा झालाच तर शाळेच्या आवारात सोय होऊ शकते. परंतू गावकऱ्यांकडून मदतीची कसलीही अपेक्षा न ठेवता आपले सर्व सामान सोबत ठेवावे. 

कुसूर घाट

कोकणातून पुण्यास मालवाहतूक करण्यासाठी कित्येक वर्षांपूर्वीपासून वापरात येणारा कुसूर घाट कोकणातील भिवपुरी ते आंदर मावळातील कुसूर या गावंदरम्यान आहे. बैलांच्या पाठीवर समान लादून ही वाहतूक करण्यात येत असल्यामुळे रस्ता बर्यापैकी मोठा, सोप्प्या चढाईचा व वळणा - वळणा चा असून जुन्या पायवाटेचे अवशेष अजूनही काही ठिकाणी सापडतात. घाट सुरु होतो तेथेच एक वाघजाई देवीची मूर्ती आहे, काही ठिकाणी ब्रिटीश कालीन मैलाचे दगड शाबूत आहेत. दरड कोसळू नये म्हणून उतारावर लावलेले व वळणावर लावलेले दगडी चिरे रस्त्याच्या कडेला पसरलेले असून ते ह्या प्राचीन घाटाची उपलब्धता व महत्व पटवून देतात. घाटाच्या मध्यावर पाण्याची ४ टाकी खोदून काढली आहेत त्यावरून ह्या घाटाच्या प्राचीनतेची साक्ष मिळते. वेळ वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तयार केलेली नवीन पायवाट ह्या जुन्या मार्गाला भेटतच पुढे जाते व ती काही ठिकाणी उभा चढ घेते. परंतु या वाटेने वर गेल्यास पाण्याची टाकी आड वाटेला राहतात व ती सहजा सहजी दिसत नाहीत. त्यामुळे ती पाहण्यासाठी गावातीलच एखादा वाटाड्या सोबत असला तर उत्तम. पायथ्याच्या भिवपुरी गावात बांधलेला तलाव हा पानिपत च्या रणांगणात वीरगती प्राप्त झालेल्या सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीबाई यांनी सदाशिवराव भाऊंच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधवून घेतला होता. मालवाहतूक करणारे लमाण, हमाल, पशु यांची तहान भागवण्यासाठी घाटाच्या खाली व वर अश्या दोन्ही ठिकाणी तलाव बांधून काढले आहेत. भिवपुरी गावातील तलाव अजूनही उत्तम अवस्थेत असून तलावातील पाणी तेथील गावकरी धुनी धुण्यासाठी वापरतात. कुसूर गावाजवळील तलाव ओस पडला असून गावकऱ्यांनी तलावाचे घडीव दगड आपापली घरे बांधण्यासाठी केला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थच देतात. घाट चढायला २ ते २.५ तास पुरेसे आहेत. घाटाच्या उजवीकडे ढाक चे पठार असून ढाक किल्ला मध्येच कधीतरी दर्शन देतो. डावीकडे भिवपुरी गावातून सावळे गावात गेलेली टाटा विद्युत केंद्राची पाण्याची पाईप लाईन व त्या पलीकडे फेण्यादेवी घाट दिसत राहतो. घाटाचा संपूर्ण मार्ग हा दाट जंगलातून जात असून अनेकविध पक्ष्यांची शिळ कानावर पडत राहते. मुंबई अथवा पुण्याहून एका दिवसाच्या चढाई साठी कुसूर घाट हा एक चांगला पर्याय होऊ शकतो. दोन दिवसाची भटकंती करायची असेल तर लोणावळा हून कोंडेश्वर मार्गे कुसूर गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कुसूर घाट उतरून भिवपुरी अथवा कर्जत ला जाता येईल. भटक्यांच्या यादीतून दूर राहिलेल्या फेण्यादेवी घाट व कुसूर घाट अश्या दोन घाटवाटा एक मुक्काम करून धुंडाळता येऊ शकतात. परंतू शहरी जीवन व तेथील कचऱ्यापासून लांब राहिलेल्या ह्या सुंदर प्रदेशाची पुरेशी काळजी घेऊनच मार्गक्रमणा करावी व तेथील निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्यावा.